शेजारच्या घरात गेलेल्या मांजरीला बाहेर फेकल्याचा जाब विचारल्याने केलेल्या मारहाणीत महिलेचा मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी (दि.२) रात्री नऊच्या सुमारास घडली. प्रभा मोहन रणपिसे (वय ४०, रा.म्हाळुंगे) असे मारहाणीत मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदकुमार साळवे यांच्या घरात जेवण सुरु असताना. रंणपिसे यांचे मांजर त्यांच्या घरात घुसले आणि त्याने ताटात तोंड घातले. रागाच्या भरात साळवे कुटुंबीयांनी ते मांजर घराबाहेर फेकले. याचा जाब प्रभा यांनी विचारला. रंणपिसे आणि साळवे यांच्यात याआधीही भांडणं झाली होती. त्यात हा वाद घडला, त्यामुळे साळवे कुटुंबीयांनी प्रभा रणपिसे त्यांची दोन मुलं आणि जावई या चौघांना बोलावून लाथा बुक्क्या, बांबू आणि पाइपने बेदम मारहाण केली. त्यात प्रभा रणपिसे यांच्या डोक्याला मार लागला आणि त्या गंभीर जखमी झाल्या. जावई आणि दोन्ही मुलं देखील जखमी झाले. प्रभा याना तातडीने औंध रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी अमोल बालगुडे, गणेश उर्फ भैया पाटील, आकाश मोंढे आणि राजीव साळवे याना हिंजवडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अधिक तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.