पिंपरी-चिंचवडमध्ये वाहतूक पोलिसांनी अनोख्या पद्दतीने आज रक्षाबंधनाचा सण साजरा केला. यावेळी वाहतुक नियमांच्या पालनाबाबत जनजागृती करीत महिला वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना राख्या बांधल्या.

बहिण भावाला राखी बांधून ज्याप्रकारे भावाकडून रक्षणाची अपेक्षा करते, त्याचप्रमाणे आज वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचे नियम मोडून इतरांचे जीव धोक्यात घारणाऱ्या वाहनचालकांना राख्या बांधून नियमांचे उल्लंघन करू नये यासाठी प्रेरित केले. सोबत नियमांचे उल्लंघन करू नये यासाठी शुभेच्छा रुपी नियमावलींचे कार्डही देण्यात आले. तब्बल पाच हजार राख्या आणि पाच हजार नियमावलींचे कार्ड वाटप करण्यात आले.

पिंपरी-चिंचवडमधील रक्षक चौक, वाकड वाय जंक्शन, तापकीर चौक, शिवार गार्डन, गोविंद गार्डन या वर्दळीच्या ठिकाणी वाहतूक पोलिसांनी असा रक्षाबंधन साजरा करत नियमांना पायदळी तुडवणाऱ्या वाहनचालकाना कार्डे भेट दिली.

हा सर्व खर्च हा वाहतूक पोलिसांनी स्वतःच्या खर्चातून केला आहे. ‘वाहतूक नियमन जनजागृती अभियान, पुणे पोलीस यांच्या सहकार्याने सांगवी वाहतूक पोलिसांनी हा उपक्रम पार पाडला. या उपक्रमात शहर वाहतूक विभागाचे अधिकारी अशोक मोराळे, राजेंद्र भामरे, पोलीस निरीक्षक किशोर मसवडे आणि सांगवी विभागाचे सर्व अधिकारी तसेच कर्मचारी यांनी सहभाग नोंदवला.

[jwplayer GPRBm6lW]