काव्याला न्याय मिळावा यासाठी उत्तम झालेली संगीतरचना बदलणारे खय्याम.. वेळेवर उपस्थित न राहणाऱ्या वादकांना घरी पाठविणारे कडक शिस्तीचे ओ. पी. नय्यर.. नोटेशननुसारच गीताचे ध्वनिमुद्रण झाले पाहिजे हा आग्रह धरणारे सी. रामचंद्र.. संगीतातील माधुर्य हीच खासियत मानणारे सलील चौधरी.. हिंदूी चित्रपटसृष्टीतील दिग्गज संगीतकारांची ही वैशिष्टय़े उलगडत या सर्वाबरोबर काम करताना शिकत मीही घडलो, अशी भावना ज्येष्ठ संगीत संयोजक इनॉक डॅनियल यांनी रविवारी व्यक्त केली.
जागतिक संगीत दिनाचे औचित्य साधून ‘संवाद पुणे’ संस्थेतर्फे ज्येष्ठ संगीतकार प्रभाकर जोग आणि इनॉक डॅनियल यांचा घुमान साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष भारत देसडला यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. वात्रटिकाकार रामदास फुटाणे, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष जितेंद्र अष्टेकर, सुनील महाजन आणि निकिता मोघे या वेळी उपस्थित होत्या.
डॅनियल म्हणाले, ‘वाडिया महाविद्यालयामध्ये असताना युवा महोत्सवातील एका नाटकासाठी अॅकॉर्डियनवादन केले होते. खरे तर, लष्करामध्ये जाण्याची माझी इच्छा होती. पण, लष्करामध्ये जाण्याऐवजी तू संगीत कला जोपासावी असे मित्राने मला सुचविले. मुंबईला गेल्यानंतर सुधीर फडके, वसंत पवार, राम कदम, प्रभाकर जोग यांच्याशी परिचय झाला. सुदैवाने मला नोटेशनची कला अवगत होती. त्याचा फायदा झाला आणि त्यानंतर संगीतामध्येच कारकीर्द घडवायची हे निश्चित केले. केवळ पाच वर्षांत मुंबईला बांद्रा येथे स्वत:चे घर घेता आले. त्या वेळी २८ रुपये चौरस फूट असा दर होता. चित्रपटसृष्टीच्या उत्तम संगीतकारांबरोबर काम करण्याची संधी मिळाल्याने मी भाग्यवान ठरलो.’
प्रभाकर जोग म्हणाले,‘ स. प. महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई सभागृहामध्ये मी केलेले व्हायोलिनवादन घरामध्ये बसून ऐकल्यानंतर सुधीर फडके यांनी मला भेटण्यासाठी बोलावले. ‘प्रतापगड’ चित्रपटासाठी वादक म्हणून त्यांच्यासमवेत काम करू लागलो. नोटेशन घेण्याची कला असल्यामुळे ‘ऊन-पाऊस’ चित्रपटापासून मी बाबुजींचा संगीत साहाय्यक झालो. ‘गीतरामायणा’ची मोठी जबाबदारी त्यांनी माझ्यावर सोपविली होती. एवढेच नव्हे तर, गीतरामायण गायनाच्या ५०० कार्यक्रमांमध्ये मी बाबुजींना व्हायोलिनची साथ केली. पुढे आपणही स्वररचना करू शकतो हा आत्मविश्वास आला आणि स्वतंत्र संगीतकार म्हणून २२ चित्रपट केले.’
कीर्ती मराठे यांचे शास्त्रीय गायन आणि सौरभ गोडबोले यांचे पियानोवादन झाले. सुनील महाजन यांनी प्रास्ताविक केले. मंजुश्री ओक यांनी सूत्रसंचालन केले.