वाहने लावण्यावरून कुरबुरी, भांडणे नित्याची स्थानिक रहिवाशांना मनस्ताप

कोंढव्यातील लुल्लानगर भागात बंगल्यासमोर प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाडय़ा लावणाऱ्या तिघांना जाब विचारणाऱ्या संगणक अभियंता तरुणाचा हकनाक बळी गेल्याची चटका लावणारी घटना शुक्रवारी रात्री घडली. शहरातील मध्यभाग तसेच उपनगरात वाहने लावण्याच्या कारणावरून किरकोळ भांडणे, कुरबुरी नित्याच्या झाल्या आहेत. बेशिस्तपणे वाहने लावण्यामुळे स्थानिक रहिवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. स्थानिकांची अवस्था तर तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी झाली असून वादापेक्षा दुर्लक्ष करणे, अशी प्रतिक्रिया सामान्यांकडून व्यक्त केली जात आहे.

बंगल्यासमोर प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाडय़ा लावणाऱ्या तिघांना संगणक अभियंता नेवल बोमी बत्तीवाला (वय ३१, रा. सहानी सुजान पार्क, लुल्लानगर) याने शुक्रवारी रात्री जाब विचारला. या कारणावरून तिघांनी नेवल यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या नेवल यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे शहरातील वाहने लावण्याची समस्या ऐरणीवर आली आहे. बेशिस्तपणे वाहने लावणाऱ्या वाहनचालकांमुळे स्थानिक रहिवाशांना मनस्ताप सोसावा लागत आहे. उपनगरांपेक्षा शहराच्या मध्यभागात वाहने लावण्याची समस्या गंभीर झाली आहे. अरुंद रस्ते, चिंचोळय़ा गल्ल्यांमध्ये वाहने लावली जातात. सम-विषम दिनांक न पाहता वाहने लावण्यात आल्यामुळे वाहतूककोंडी होते. लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता भागातील अरुंद गल्ल्यांमध्ये अनेक सोसायटय़ा आहेत.

शहराच्या मध्यभागात खरेदीसाठी येणारे नागरिक, तसेच व्यापारी पेठांमधील कामगार या भागात वाहने लावतात. सदाशिव पेठ, नारायण पेठ, बाजीराव रस्ता भागात अनेक कोंचिग क्लास आहेत. तेथे येणारे विद्यार्थी बेशिस्तपणे वाहने लावतात. शनिवारी आणि रविवारी या भागांत अनेक जण खरेदीसाठी येतात. मोटारी रस्त्याच्या कडेला किंवा सोसायटीच्या दारात लावून चालक निघून जातात. खरेदी करून येईपर्यंत वहिवाटीचा रस्ता मोकळा होत नाही. स्थानिक रहिवाशांनी जाब विचारण्याचा प्रयत्न केला तर त्यातून वाद निर्माण होतात. वादाचे पर्यवसान शिवीगाळ, मारामारीपर्यंत होते. त्यामुळे बऱ्याचदा स्थानिक रहिवाशांकडून दुर्लक्ष केले जाते. वाद घालण्यापेक्षा दुर्लक्ष केलेले चांगले, अशी प्रतिक्रया या भागातील नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. शहराच्या मध्यभागात मंडई, आयर्न चित्रपटगृह, नारायण पेठ भागात महापालिकेकडून वाहनतळ बांधण्यात आले आहेत. मध्यभागात एकूण चार वाहनतळे आहेत. बऱ्याचदा ही वाहनतळे भरलेली असतात. त्यामुळे मध्यभागातील गल्ल्यांमध्ये मोटारी लावून वाहनचालक निघून जातात.

उपनगरातही वाहने लावण्याची समस्या

शहरात दुचाकी वाहनांबरोबरच चारचाकी वाहनांची संख्या वाढत आहे. मध्यभागाबरोबरच उपनगरातही वाहने लावण्याची समस्या आहे. कोथरूड, कर्वेनगर, सिंहगड रस्ता, धनकवडी, भारती विद्यापीठ, वानवडी भागातील अनेक सोसायटय़ांच्या अंतर्गत रस्त्यावर काही जण वाहने लावतात. त्यामुळे स्थानिक रहिवाशांना त्रास होतो. काही सोसायटय़ांच्या अंतर्गत रस्त्यांवर बेकायदा ट्रक, प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाडय़ा लावल्या जातात. रात्री वाहने लावून पुन्हा सकाळी ही वाहने काढली जातात. सोसायटय़ांलगत असलेल्या वस्त्यांमधील नागरिक तेथे वाहने लावतात. त्यांना जाब विचारण्याची सोय नसते.

सम-विषम दिनांक न पाहता दुतर्फा वाहने लावणाऱ्या वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात येते. सार्वजनिक रस्ता तसेच खासगी रस्त्यावर वाहने लावण्यास मनाई करण्याबाबतच्या तक्रारी पोलिसांकडे आल्यास वाहतूक पोलिसांकडून या भागाची पाहणी करण्यात येते. तेथील नागरिकांची मते, सूचना जाणून घेण्यात येतात. त्यानंतर या भागात दुतर्फा वाहने लावण्यास मनाई करण्याबाबतचे आदेश जारी करण्यात येतात. मॉल, हॉटेल, व्यापारी संकुल, दुकानांच्या बांधकामांना परवानगी देताना वाहतूक पोलिसांकडून प्रत्यक्ष पाहणी करण्यात येते. 

– अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा