घाटातील दुर्मिळ वनौषधी, कीटक व पक्ष्यांच्या संरक्षणासाठी निर्बंध

पुणे : ताम्हिणी घाटातील दुर्मिळ वनौषधी, कीटक आणि पक्ष्यांच्या प्रजाती नामशेष होण्यापासून रोखण्यासाठी ताम्हिणीत येणाऱ्या पर्यटकांना वन विभागाची परवानगी घेणे सक्तीचे करण्यात येणार आहे. पर्यटकांसाठी नियमावलीही तयार केली जात असून हे काम अंतिम टप्प्यात आहे.

वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून याबाबत माहिती देण्यात आली. ताम्हिणी घाट आणि परिसरातील जैवविविधतेचे जतन करण्यासाठी तसेच निसर्ग आणि वनांची समृद्धी जपली जावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पावसाळी पर्यटनासाठी पुणे आणि आसपासच्या परिसरातील पर्यटक ताम्हिणीला जाणे पसंत करतात. ताम्हिणीच्या परिसरात असलेली अंधारबन, प्लस व्हॅली, डोंगरवाडी, निवे, देवकुंड ही ठिकाणे विशेष लोकप्रिय असल्याने शनिवार आणि रविवारी या परिसरात हजारो पर्यटक येतात. मात्र वाढत्या मानवी हस्तक्षेपामुळे ताम्हिणीतील दुर्मिळ वनौषधी, कीटक, पक्षी असे जैववैविध्य नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. निसर्गातील दुर्मिळ वनस्पती आणि पक्ष्यांच्या प्रजातींचे संवर्धन व्हावे तसेच गर्दीमुळे कोणतेही अनुचित प्रकार होऊ नयेत यासाठी नियमावली करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. १५ ऑगस्टपर्यंत ही नियमावली तयार करण्याचे काम पूर्ण होणार असून त्यानंतर ताम्हिणीत जाण्यासाठी लेखी परवानगी आवश्यक ठरणार आहे.

सहाय्यक वनसंरक्षक महेश भावसार म्हणाले, ताम्हिणीच्या क्षेत्रातील लोकप्रिय पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी शनिवार आणि रविवारी हजारो नागरिक येतात. इतर दिवशीसुद्धा पर्यटकांची संख्या प्रतिदिनी पाचशेच्या घरात असते. वनक्षेत्र आणि पावसाचे प्रमाण सर्वाधिक असल्याने परिसर निसरडा होतो. पर्यटनासाठी आल्यानंतर निसर्गाचा आनंद लुटण्यात रमलेल्या पर्यटकांकडून आवश्यक खबरदारी घेतली जात नाही. त्यातून अपघात होतात. हे थांबवण्यासाठी पौड येथील कार्यालयातून प्रत्येकी १३० रुपये शुल्क आकारले जात आहे.

ताम्हिणीतील जंगल हे संरक्षित वनक्षेत्र आहे. वनौषधी, कीटक यांच्याबरोबरच साप, बेडूक यांच्या दुर्मिळ प्रजाती आणि अनेक स्थलांतरित पक्षी येथे दिसून येतात. मोठय़ा संख्येने येणाऱ्या पर्यटकांबरोबर प्लास्टिक, बाटल्या असा कचरादेखील जंगलात येतो. त्यातून पर्यावरणाचा ऱ्हास होतो. हे टाळण्यासाठी अशी नियमावली असणे आवश्यक आहे.

अनुज खरे, विश्वस्त, नेचर वॉक