‘येवले अमृततुल्य’ हा विषय चहाप्रेमींमध्ये सध्या खूप चर्चेचा आहे. ‘येवले चहा, एकदा पिऊन तर पाहा’ असं या अमृततुल्यचं आवाहन आहे. चहा तयार करण्याचा कारखाना आहे असं वाटावं, अशा पद्धतीने येवले अमृततुल्यमध्ये चहा तयार होत असतो. चहा तयार करण्याची इथली पद्धतही हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी आलेले लोक खास थांबून पाहात राहतात.

पुण्यातल्या ‘अमृततुल्य’ हॉटेलांची सफर गेल्या शनिवारी झाली. ती माहिती वाचून अगदी सहजपणे अनेकांनी येवले चहा हा विषय काढला. चहाप्रेमींमध्ये सध्या येवले चहा हा चर्चेचा विषय ठरला आहे. बुधवार चौकात येवले अमृततुल्य सुरू झालं आणि या चहाला एवढी पसंती मिळाली की पाहता पाहता येवले अमृततुल्यच्या शाखा विविध भागांत झाल्या. या प्रत्येक ठिकाणी चहाप्रेमींची गर्दी होतअसल्याचं पाहायला मिळतं. येवले कुटुंबीयांचे कष्ट आणि उद्यमशीलता या व्यवसायामागे आहे.

flowers, plant flowers,
निसर्गलिपी : हिरवा कोपरा
Lok Sabha Election, Lok Sabha Election 2024,
डोके ठिकाणावर ठेवून मतदान कराल ना?
Bombay high court, verdict, Compensation, acid attack victims
अ‍ॅसिड हल्ल्यातील जुन्या पीडितांना नवीन योजनेचा लाभ मिळणार
why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?

जाड काचेच्या कपामध्ये दिला जाणारा चहा हे येवले चहाचं चटकन लक्षात येणारं वैशिष्टय़ं. हल्ली कपात चहा देण्याची पद्धत अमृततुल्य हॉटेलांमध्ये दिसत नाही. बहुतेक सर्व ठिकाणी काचेच्या ग्लासमध्येच चहा दिला जातो. पण कपात दिल्या जाणाऱ्या चहाची चव वेगळी लागते, असं येवले यांचं म्हणणं आहे. त्यामुळे इथे चहा कपातच दिला जातो. दूध गरम करण्यासाठी इथे यंत्राचा वापर केला जातो. इथे गेल्यानंतर तुम्हाला कधी थांबावं लागलं किंवा चहा तयार नाही, असं कधी होत नाही. त्यामुळे इथली तत्परता देखील तुमच्या लगेच लक्षात येते. त्याबरोबरच स्वच्छताही नजरेत भरते. येणाऱ्या ग्राहकांशी येवले मंडळींचं चांगलं नातं असल्याचंही दिसतं. या सगळ्याबरोबरच चहाच्या चवीतलं वेगळेपण आणि केव्हाही गेलो तरी त्याच चवीचा चहा मिळणार याची खात्री. अशी सगळी वैशिष्टय़ं असल्यामुळे स्वाभाविकच येवले चहा चर्चेत आला. या व्यवसायातलं आणखी एक वैशिष्टय़ं म्हणजे इथे चहाशिवाय अन्य कोणतेही खाद्यपदार्थ ठेवले जात नाहीत. त्यामुळे आम्हाला फक्त चहावर लक्ष केंद्रित करता येतं आणि त्यातून दर्जा टिकवता येतो, असं येवले मंडळी सांगतात.

पुरंदर तालुक्यातील आस्करवाडी येथील हे येवले कुटुंब. या कुटुंबाचा मूळचा व्यवसाय दुधाचा. व्यवसाय फार मोठा नव्हता, तरी थोडं दूध शिल्लक राहत असे. त्यातून चहाच्या हॉटेलची कल्पना दशरथ येवले यांच्या मनात आली आणि त्यांनी भाडय़ाने जागा घेऊन लष्कर भागात चहा विक्रीचा व्यवसाय भागीदारीत सुरू केला. पुढे सॅलिसबरी पार्क भागात ‘गणेश अमृततुल्य’ या नावाने त्यांनी स्वत:चं हॉटेल सुरू केलं. घरातील अन्य मंडळीही हा व्यवसाय पाहात होती आणि तो पाहत असतानाच पुण्यात आपल्या स्वत:च्या नावाचं काही तरी उत्पादन असावं, अशी सर्वाची इच्छा होती. त्यातून नवनवीन कल्पनांवर काम करत चहाच्या हॉटेलची कल्पना पुढे आली. चहाची उत्तम चव कशी तयार होईल याचा या मंडळींनी अभ्यास केला आणि जून २०१७ मध्ये भारती विद्यापीठ येथे येवले अमृततुल्य सुरू झालं. हे हॉटेल सुरू होताच ग्राहकांची येवले चहाच्या चवीला उत्स्फूर्त पसंती मिळाली. येवले कुटुंबातील नवनाथ, गणेश आणि नीलेश हे बंधू, तसंच याच परिवारातील मंगेश आणि तेजस हे बंधू असे मिळून पाच जण आता हा व्यवसाय समर्थपणे सांभाळत आहेत. या सगळ्यांकडे असलेली उद्यमशीलता निश्चितच लक्षणीय आहे. सर्व हॉटेल्सचं व्यवस्थापन सांभाळणं हे अवघड काम. पण सगळे बंधू मिळून सर्व व्याप सांभाळतात.

पहिल्या हॉटेलला मिळालेल्या प्रतिसादानंतर येवले चहाची दुसरी शाखा बुधवार चौकात फरासखान्यासमोर सुरू झाली आणि येवले चहाची प्रसिद्धी मोठय़ा प्रमाणात झाली आणि चर्चाही झाली. चहाप्रेमींना या चहाची चव आवडल्याचे लक्षात आल्यानंतर सदाशिव पेठेत तसेच शिवाजीनगरला शाखा उघडण्यात आल्या. त्यानंतर हत्ती गणपती चौक, पिंपरीतील शगुन चौक इथेही येवले चहा सुरू झाला आणि डेक्कन जिमखाना, मामलेदार कचेरी, कोंढवा, वाघोली इथे लवकरच नव्या शाखा सुरू होत आहेत.

चवीमध्ये तसंच दर्जात आणि तत्पर सेवेत सातत्य ठेवलं तर चांगलं यश मिळू शकतं, हे येवले यांनी दाखवून दिलं आहे. एकुणातच येवले चहाची चर्चा का आहे हे तिथे गेल्यावर सहजच लक्षात येतं.

vinayak.karmarkar@expressindia.com