वयात येणाऱ्या मुलांना संवादामधूनच आव्हानांना सामोरे जाण्याविषयी मार्गदर्शन करता येईल, असे मत डॉ. वैशाली देशमुख यांनी व्यक्त केले.

‘निसर्गसंवाद’ संस्थेने आयोजित केलेल्या कट्टय़ावर ‘वयात येणाऱ्या मुलांच्या पालकांपुढील आव्हाने’ या विषयावर त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, बदलत्या काळानुसार केवळ वयात येणाऱ्या मुलांच्याच नाही, तर पालकांसमोरही आव्हाने उभी असल्याचे त्यांनी सांगितले. या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी पालक आणि मुले यांच्यात योग्य संवाद व्हायला हवा असे त्यांनी सांगितले. स्पर्धात्मक जगात वावरत असताना, त्यांना विविध उपक्रमांमधून, तसेच वेगवेगळ्या गोष्टी, निर्णय यातून अनुभवसंपन्नता येते, ते अनुभवच त्यांना समृद्ध करतात, त्यामुळे हे अनुभव घेण्याची संधी त्यांना द्या. त्यांच्या कूपमंडुक वृत्तीला प्रोत्साहन देऊ नका, तसेच त्यांची वृत्ती जर कूपमंडुक होत असेल तर त्यांना या परिस्थितीतून बाहेर काढून अनुभव घेण्यासाठी सिद्ध करा.

मुले ही पालकांच्या वर्तनानुसार आपले वर्तन ठरवत असतात, त्यामुळे पालकांनीदेखील आपले वर्तन योग्य-अयोग्य असल्याची खात्री करुन घेण्याची गरज असते. आभासात्मक जगात वावरणाऱ्या मुलांना या जगातून बाहेर काढण्याची आणि वास्तवाचे भान देण्याची जबाबदारी पालकांची असल्याचेही त्यांनी सांगितले. नंदू कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. वैभव रांजणगावकर यांनी आभार मानले.