आभासी असलेल्या सोशल माध्यमातून झालेली मैत्री एका तरूणीच्या अंगलट आली. फेसबुकवर मैत्री झाल्यानंतर भेटण्यासाठी आलेल्या मुलीवर तरुणाने गुंगीचे औषध देऊन बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तरुणाकडून ब्लॅकमेल केले जात होते. दरम्यान, याप्रकरणी पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणी व आरोपी तरुणाची फेसबुकवरून ओळख झाली. त्यांच्यात फेसबुकवरूनच चॅटिंग सुरू झाले. त्यानंतर आरोपीने पीडित तरुणीला स्वारगेट परिसरात भेटण्यास बोलावले. दोघेही स्वारगेट परिसरातील एका लॉजमध्ये भेटले. तरुणीचे डोके दुखत होते. त्या वेळी आरोपीने तिला डोकेदुखी थांबेल म्हणून एक गोळी खायला दिली. ती गोळी घेतल्यावर तरुणी बेशुद्धावस्थेत गेली. त्यानंतर आरोपीने तिच्यावर बलात्कार केला व तिचे अश्लील फोटो काढले. तसेच नंतर आरोपीने तरुणीला या फोटोंवरून ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. ते फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देऊन, तो तिला कोठेही बोलवू लागला. हा प्रकार आरोपीच्या आईला समजला. त्या वेळी आरोपीच्या आईने पीडित तरुणीला, ‘माझ्या मुलास नादाला लावले, असे म्हणून शिवीगाळ केली.’ तर, हा प्रकार आरोपीच्या वडिलांना सांगितल्यानंतर त्यांनी लग्न लावून देण्याचे आश्वासन दिले; पण, तसे न करता त्यांनी तरुणीची फसवणूक केली. त्यानंतर तरुणीने स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार आरोपीसह त्याच्या आई-वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निशांत वामन भांगे (वय २८), नंदा भांगे, वामन भांगे (सर्व रा. काळेपडळ, हडपसर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.