MSBSHSE 10th Result 2022 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात येणार आहे. दुपारी एक वाजता विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाइन पद्धतीने पाहता येईल. राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी ही माहिती दिली. करोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षी दहावीची परीक्षा न होता अंतर्गत मूल्यमापनाद्वारे निकाल जाहीर करण्यात आला. त्यामुळे यंदाच्या परीक्षेबाबतही साशंकता होती. मात्र यंदा करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य मंडळाने दहावीची परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला.
या पार्श्वभूमीवर यंदा मार्च-एप्रिलमध्ये दहावीची परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात आली. राज्यातील १६ लाख ३८ हजार ९६४ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. संकेतस्थळाद्वारे विद्यार्थ्यांना विषयनिहाय मिळालेले गुण पाहता येतील, तसेच माहिती प्रत (प्रिंट आउट) घेता येईल. तर गुणपत्रिका वाटपाबाबत स्वतंत्रपणे कळवण्यात येईल, असे मंडळाने स्पष्ट केले. गुणपडताळणीसाठी २० ते २९ जून, छायाप्रतीसाठी २० जून ते ९ ऑगस्ट या कालावधीत अर्ज करता येईल. पुनर्मूल्यांकनासाठी आधी उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
कुठे पहाल? maharesult.nic.In किंवा hscresult.mkcl.Org किंवा msbshse.co.in या संकेतस्थळावर.
पुरवणी परीक्षेचे अर्ज २० जूनपासून
अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी होणाऱ्या पुरवणी आणि श्रेणीसुधार परीक्षेचे अर्ज २० जूनपासून भरून घेतले जाणार असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. उत्तरपत्रिकांची गुणपडताळणी, छायाप्रत किंवा पुनर्मूल्यांकन करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी https://varification.mh-ssc.ac.in/ संकेतस्थळाद्वारे अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.