अकरावी प्रवेशाच्या अजून दोन फे ऱ्या घेण्यास शासनाने परवानगी दिली असून या दोन्ही फे ऱ्या ऑनलाईन होणार आहेत. चारही फे ऱ्यांमधून प्रवेश मिळू न शकलेल्या आणि अर्जातील त्रुटींमुळे प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी पाचवी फेरी होणार आहे. दूरचे महाविद्यालय मिळाले, प्रवेश रद्द केला अशा कारणांमुळे प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष फेरी घेण्यात येणार आहे. मात्र महाविद्यालय मिळूनही प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांना मिळालेल्या महाविद्यालयांत जागा रिक्त असल्यास त्या महाविद्यालयांत प्रवेश घेता येणार आहे.

अकरावीच्या चार प्रवेश फे ऱ्या होऊनही १४२ विद्यार्थ्यांना महाविद्यालय मिळू शकले नाही. त्याचप्रमाणे अर्ज न भरल्यामुळे, अर्जातील त्रुटींमुळे काही विद्यार्थ्यांना महाविद्यालय मिळू शकले नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी पाचवी प्रवेश फेरी घेण्यात येणार आहे. त्यानंतर विशेष फेरीचे आयोजन करण्यात येणार आहे. दूरचे महाविद्यालय मिळाले, महाविद्यालयांत हवे असेलेले विषय नाहीत, महाविद्यालयांचे प्राधान्यक्रम चुकले त्यामुळे महाविद्यालय बदलून देण्याची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही विशेष फेरी होणार आहे. या फेरीत विद्यार्थ्यांची नव्याने नोंद करून त्यांच्याकडून रिक्त राहिलेल्या जागांसाठी पुन्हा प्राधान्यक्रम भरून घेण्यात येणार आहेत. या दोन्ही फेऱ्यांसाठी नव्याने मंजुरी मिळालेल्या महाविद्यालयांचाही समावेश करण्यात येणार आहे. त्यामुळे एकूण जागा वाढण्याची शक्यता आहे. दोन्ही फे ऱ्या ऑनलाईन होणार आहेत.

या प्रवेश फे ऱ्यांबाबतचे तपशील ठरवण्यासाठी शुक्रवारी केंद्रीय प्रवेश समितीची बैठक होणार आहे. त्यानंतर पाचव्या आणि विशेष फे ऱ्यांचे सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय प्रवेश समितीचे अध्यक्ष दिनकर टेमकर यांनी दिली.

महाविद्यालय मिळूनही प्रवेश न घेणाऱ्यांना संधी नाही

केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या चार फेऱ्यांमध्ये महाविद्यालय देण्यात येऊनही विद्यार्थ्यांनी या महाविद्यालयांत तात्पुरता प्रवेशही घेतला नाही, अशा विद्यार्थ्यांना या प्रवेश प्रक्रियेतून बाहेर जावे लागेल. या विद्यार्थ्यांना आता दिलेल्या महाविद्यालयांत रिक्त जागा असल्यास त्यावरच प्रवेश मिळणार आहे. या विद्यार्थ्यांचा पाचव्या आणि विशेष फेरीत समावेश करण्यात येणार नाही. या विद्यार्थ्यांनी त्यांचा प्रवेश निश्चित करण्यासाठीचे वेळापत्रकही शुक्रवारी जाहीर करण्यात येणार आहे.