खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डात वाहनांच्या प्रवेशकराचा ठेका मिळविण्यासाठी टेंडर भरण्यास आलेल्यांवर हत्यारांनी हल्ला करण्याच्या प्रकरणातील अकरावा आरोपी खडकी पोलिसांच्या हाती लागला आहे. या आरोपीला एक एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश बुधवारी न्यायालयाने दिले. या प्रकरणात आमदारपुत्र कुलदीप बागवे व खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष मनिष आनंद हे मात्र अद्यापही फरार आहेत.
रणजित श्याम बत्रा (वय २८, रा. गणराज हाईट्स, वडगाव शेरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणात दहा जणांना यापूर्वी अटक करण्यात आली होती. त्याचप्रमाणे तीन आरोपींचे अटकपूर्व जामीन न्यायालयाने यापूर्वीच फेटाळले आहेत.
खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या परिसरात प्रवेश करणाऱ्या वाहनांवर प्रवेश कराची आकारणी करण्यात येते. हा कर जमा करण्याचे काम खासगी ठेकेदारांना देण्यात येते. त्यानुसार मागील महिन्यामध्ये कॅन्टोन्मेंट बोर्डाने हा कर जमा करण्यासाठी खासगी ठेकेदारांकडून टेंडर मागविले होते. हे टेंडर भरण्यासाठी बोर्डाच्या कार्यालयात आलेल्या काही लोकांवर आरोपींनी १३ फेब्रुवारीला शस्त्रांनी हल्ला केला होता. दहशत पसरविण्यासाठी या घटनेत गोळीबारही झाला होता. या घटनेतील जखमी तेजिदरसिंग अहलुवालिया यांच्यावर अद्याप ससून रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे विवेक यादव हेही हल्ल्यात जखमी झाले होते. गुन्ह्य़ातील हत्यारे जप्त करण्यासाठी त्याचप्रमाणे घटनेचा सखोल तपास करण्यासाठी आरोपींना पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांच्या वतीने करण्यात आली होती. या घटनेत चोरीला गेलेला माल व रोख पाच लाख रुपये जप्त करण्याचेही कारण पोलीस कोठडी देण्यासाठी करण्यात आले होते.