पुण्यातील कात्रज प्राणी संग्रहालयात केली रवानगी
लोणावळा परिसरात १२ फुट लांब अजगर आढळला असून त्याची मान मोडल्याच समोर आलं आहे. त्याच्यावर तळेगाव येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. उपचारांनंतर त्याची पुण्यातील कात्रज प्राणी संग्रहालयात रवानगी करण्यात आली आहे. या अजगरावर अधिक उपचार गरजेचे असून ते कात्रज प्राणी संग्रहालयात केले जाणार आहेत.
महाराष्ट्रात अजगर ही जात दुर्मिळ होत चालली आहे. वन्यजीव कायद्यानुसार अजगराला संरक्षण दिले गेले आहे. लोणावळ्याच्या देवली गावामध्ये परिसरात १२ फूट लांबीचा अजगर गावकऱ्यांना आढळला. या अजगराची मान मोडल्याचे गावकऱ्यांच्या लक्षात आले. त्यानुसार संबंधित गावकऱ्यांनी सर्प मित्रांना फोनद्वारे माहिती दिली. तात्काळ सर्प मित्र घटनास्थळी झाले. सर्प मित्रांनी जखमी अजगराला पकडले.
प्राथमिक पहाणी केल्यानंतर या अजगराला नेमकं काय झालं आहे यासंदर्भात सर्पमित्रांनी पहाणी केली. त्यावेळी या अजगराची मान मोडल्याने त्याला भक्ष्य गिळता येत नसल्याचे सर्पमित्रांच्या लक्षात आले. तात्काळ या अजगराला तळेगाव येथे पशुवैद्यकीय रुग्णालयात हलवण्यात आले. तेथून त्याला आता पुण्यातील कात्रज प्राणी संग्रहालयात पाठवण्यात आले आहे.