ग्रामीण भागातील मुलामुलींपर्यंत वाचनसंस्कृती पोहोचविण्यासाठी कार्यरत असलेल्या ‘ग्यान की वाचनालय’ या उपक्रमांतर्गत आतापर्यंत १२५५ वाचनालये उघडण्यात आली असून, आता पुढील ४९ दिवसांत ग्रामीण भागातील शाळांमध्ये तब्बल १८४० वाचनालये उघडण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या उपक्रमांद्वारे राज्यातील साडेआठ लाख विद्यार्थ्यांपर्यंत पुस्तके पोहोचविण्यात येणार आहेत. या उपक्रमाची सुरुवात पुढील आठवडय़ापासून होणार आहे. ऑक्टोबर महिना पूर्ण व्हायच्या आत राज्यभर ही १८४० वाचनालये उभी राहणार आहेत. या उपक्रमाची नोंद गिनीज बुकमध्ये करण्यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत.
‘ग्यान की वाचनालय’ या उपक्रमाचे संस्थापक आणि सामाजिक उद्योजक प्रदीप लोखंडे यांनी याबाबत माहिती दिली. ग्रामीण भागातील मुलांमध्ये वाचनाची काही प्रमाणात तरी आवड निर्माण व्हावी आणि वाचनाद्वारे त्यांच्या मानसिकतेत सकारात्मक फरक पडावा, या उद्देशाने ग्रामीण भागातील शाळांमध्ये वाचनालये सुरू करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. आतापर्यंत या उपक्रमाद्वारे ६७० दिवसांत १२५५ वाचनालये सुरू करण्यात आली आहेत. ही सर्व वाचनालये ग्रामीण भागात आणि माध्यमिक शाळांमध्येच आहेत. त्याद्वारे तीन लाख विद्यार्थ्यांपर्यत पुस्तके पोहोचविण्यात आली आहेत. या वाचनालयांची परिणामकारकता सातत्याने तपासली जाते. त्यात असे आढळले आहे की, आतापर्यंत तब्बल ९४ हजार विद्यार्थ्यांनी पुस्तक वाचल्याची माहिती पोस्ट कार्डद्वारे कळविली आहे.
या टप्प्यानंतर आता केवळ ४९ दिवसांमध्ये १८४० शाळांमध्ये वाचनालये उभी करण्याचे उद्दिष्ट घेण्यात आले आहे. त्याद्वारे दररोज ३५ शाळांमध्ये ही वाचनालये उभी राहतील. प्रत्येक वाचनालयात विविध विषयांच्या, लोकप्रिय अशा किमान १७० ते २०० पुस्तकांचा समावेश असणार आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिना पूर्ण व्हायच्या आत वाचनालयांची ही चळवळ राज्यातील एकूण तीन हजारांहून अधिक शाळांपर्यंत पोहोचलेली असेल. त्याद्वारे किमान साडेआठ लाख मुला-मुलींपर्यंत ही पुस्तके पोहोचलेली असतील, असे लोखंडे यांना सांगितले.
 
‘‘या वाचनालयात कोणत्याही पाठय़पुस्तकाचा समावेश नाही. त्यात विद्यार्थ्यांच्या मनात येणाऱ्या विषयातील बहुतांश विषयांतील किमान एक तरी पुस्तक असेल, याची काळजी घेण्यात आली आहे. साहस, संगीत, नाटक, आपत्ती व्यवस्थापन, लैंगिक शिक्षण, किल्ले अशा सर्वच विषयांच्या पुस्तकांचा त्यात समावेश आहे. ही सर्व पुस्तके लोकप्रिय व वाचनीय अशीच आहेत. अग्निपंख, बटाटय़ाची चाळ, सुधा मूर्ती यांचे थैलीभर गोष्टी, सुनीता विल्यम्स, बोक्या सातबांडे, नापास मुलांची गोष्ट.. ही काही उदाहरणे.
गावातील पालक आपल्या मुलामुलींसाठी पुस्तके खरेदी करतीलच याची खात्री नसते. त्यामुळे फक्त ग्रामीण भागातील माध्यमिक शाळांमध्येच ही वाचनालये सुरू करण्यात येत आहेत. सर्व १८४० वाचनालयांच्या ‘ग्यान की मॉनिटर’ (समन्वयक) मुलीच असणार. ‘फिनोलेक्स पाईप्स’चे कार्यकारी अध्यक्ष प्रकाश छाब्रिया यांनी एकूण दीड हजार वाचनालयांसाठी देणगी दिली आहे. आमचे पुढील उद्दिष्ट राज्यातील सर्व ग्रामीण शाळांमध्ये पोहोचण्याचे आहे. आताच्या उपक्रमाची नोंद विक्रम म्हणून गिनीज बुकमध्ये व्हावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.’’
– प्रदीप लोखंडे (संस्थापक, ‘ग्यान की वाचनालय’ उपक्रम)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 1840 libraries for rural students by gyan ki vachanalaya
First published on: 27-08-2014 at 03:20 IST