पुणे : लायबेरियातील एका १९ वर्षीय तरुणीला गर्भाचा हात त्याच्या डोक्याजवळ असल्याने सिझेरियन शस्त्रक्रिया करावी लागली. मात्र, तिने डॉक्टरांचा सल्ला न ऐकता पुढील उपचारांकडे दुर्लक्ष केले. यामुळे गुंतागुंत वाढून तिला ताप आला आणि श्वसनक्रिया बंद पडू लागली. डॉक्टरांनी वेळीच उपचार करून या जीवघेण्या गुंतागुंतीतून तिची सुटका केली.
लायबेरियातील या तरुणीला सिझेरियन शस्त्रक्रियेनंतर गंभीर गुंतागुंत निर्माण झाली होती. तिला पोस्ट व्हायरल न्यूमोनायटिस झाला होता. त्यात एकाच वेळी विषाणूसह जीवाणूसंसर्ग होऊन प्रकृतीमध्ये गुंतागुंत निर्माण होते. याचबरोबर तिला श्वसनास त्रास होत असल्याने तिच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळीही अत्यंत खालावली होती. तिला रूबी हॉल क्लिनिकमधील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. त्यावेळी सुरुवातीला तिला बायपॅप व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. तसेच तिला कृत्रिम ऑक्सिजनचा पुरवठा सुरू करण्यात आला.
डॉक्टरांनी या तरुणीला प्रतिजैविक, विषाणूप्रतिबंधक औषधे सुरू केली. याचवेळी तिच्या शरीरातील पोषणद्रव्यांची पातळी कायम राहावी, यासाठी तिला सलाईन लावण्यात आले. अखेर उपचारानंतर १४ दिवसांनी या तरुणीच्या प्रकृतीत सुधारणा झाली. या कालावधीत तिला कृत्रिम ऑक्सिजनचा पुरवठा सुरू ठेवण्यासोबत तिच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले. तिची प्रकृती स्थिर होण्यासाठी डॉक्टरांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू होते. अखेर तिची प्रकृती स्थिर झाल्यानंतर बाळाशी तिची भेट घडवून देण्यात आली. हे उपचार रुबी हॉल क्लिनिकमधील औषधवैद्यकशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. निर्मला कॅस्टेलिनो आणि संसर्गरोगतज्ज्ञ डॉ. देवाशिष पटेल यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय पथकाने केले.
संबंधित तरुणी आमच्याकडे एकटी आली होती. त्यावेळी तिला श्वासही नीट घेता येत नव्हता. तिच्या स्थितीकडे पाहून नातेवाईकांची विचारणा न करता आम्ही उपचार सुरू केले. बरे झाल्यानंतर पुन्हा ती बाळाला भेटली, यातूनच आम्हाला आरोग्य सेवेचे समाधान मिळाले.
– डॉ. निर्मला कॅस्टेलिनो, प्रमुख, औषधशास्त्र विभाग, रूबी हॉल क्लिनिक