आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणात मुंबई पोलिसांनी अटक केलेल्या किशोर लालचंद बदलानी ऊर्फ केशु पुणे (वय ३८) याच्यावर पुण्यातील पिंपरी पोलीस ठाण्यात मुंबई जुगार कायद्याखाली बेटिंगचे दोन गुन्हे दाखल आहेत. त्याला दोन वेळा पुणे पोलिसांनी अटक केली होती. मात्र, त्याच्याकडे केलेल्या तपासात तो आंतरराष्ट्रीय बुकींशी संपर्कात नसल्याचे समोर आले होते.
 गेल्या काही वर्षांपासून केशुपुणे हा पिंपरी चिंचवड परिसरात बेटिंग घेत होता. जानेवारी २०१३ मध्ये पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भानुप्रताप बर्गे यांनी त्याला पिंपरी कॅम्प येथील एका इमारतीमध्ये बेटिंग घेताना अटक केली होती. तो कोलकाता येथील भारत-पाकिस्तान सामन्यावर मोबाइलवरून बेटिंग घेत होता. त्याच्यासोबत सातजणांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून दोन एलसीडी, दहा मोबाइल, लॅपटॉप असा एकूण ६६ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला होता. या गुन्हय़ात त्याची सर्व माहिती काढली होती. पण, त्याचे देशाबाहेरील बुकींशी संबंध असल्याचे समोर आले नव्हते. केशुपुणेवर यापूर्वी मार्च २०११ मध्येही बेटिंगचा गुन्हा दाखल असून त्यामध्येही त्याला अटक झाली होती. याबाबत पोलीस उपायुक्त शहाजी उमाप यांनी सांगितले की, पिंपरी पोलीस ठाण्यात बदलानीवर मुंबई पोलीस जुगार कायद्याखाली दोन गुन्हे दाखल आहेत. त्याला अटक केल्यानंतर मुंबई पोलिसांनी आमच्याशी संपर्क साधलेला नाही.
केसुपुणे हा पिंपरी येथील वैभवनगर सोसायटीमध्ये राहण्यास आहे. त्याचा वाकड येथे मोटारीचे स्पेअर पार्ट विक्रीचा व्यावसाय आहे. गेल्या पाच ते सहा वर्षांपासून तो बेटिंगमध्ये आहे. क्रिकेट हा त्याचा आवडीचे खेळ असल्याने तो स्पेअर पार्ट विक्रीचा व्यावसाय करत असताना बेटिंग खेळू लागला. सुरूवातीस तो एका बुकीकडे काम केल्यानंतर त्याने स्वत:बुकी म्हणून काम सुरू केले. आयपीएल स्पॉट फिक्सींग प्रकरणी मुंबई पोलिसांनी २७ मे रोजी पुण्यातील बुकी देवेश शर्मा आणि रमेश व्यासला अटक केली होती. त्यांच्याकडून केसुपुणेचे नाव समोर आले. तेव्हापासून मुंबई पोलीस त्याच्या मागावर होते. तो युरोपला पळून गेला होता. त्याला सोमवारी पहाटे मुंबई विमानतळावर अटक केली असून त्याचा ‘डी’ कंपनीशी संबंध असल्याचा पोलिसांचा संशय आहे.