पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने ८ ते १५ जानेवारी या कालावधीत पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील ८ ठिकाणी १३ वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (पिफ) होणार आहे. यंदाच्या महोत्सवात ७५ हून अधिक देशांच्या दोनशेहून अधिक चित्रपटांची पर्वणी दर्शकांना अनुभवता येणार आहे.
पहिल्या महायुद्धाची १०० वर्षे आणि बर्लिनची भिंत पडण्याच्या घटनेला २५ वर्षे पूर्ण होत आहेत. जागतिक बदल घडविणाऱ्या या घटनांची संवेदनशील नोंद घेणारे चित्रपट यंदाच्या महोत्सवात पाहण्याची संधी मिळणार आहे. जागतिक शांततेचा संदेश आणि मानवता अधोरेखित करणे चित्रपट हे या वर्षीच्या महोत्सवाचे ब्रीद असल्याची माहिती महोत्सवाचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
आंतरराष्ट्रीय आणि मराठी चित्रपट स्पर्धात्मक विभाग, विद्यार्थी चित्रपट, अॅनिमेशन फिल्म, लघुपट स्पर्धा, जागतिक चित्रपट, देश विशेष (कंट्री फोकस), सिंहावलोकन (रेट्रोस्पेक्टिव्ह), भारतीय सिनेमा, ट्रिब्यूट (श्रद्धांजली), विविध देशांतील लक्षणीय चित्रपटांचा कॅलिडोस्कोप, फिल्म डिव्हिजनचे माहितीपट अशा विविध १३ विभागातील दोनशेहून अधिक चित्रपटांचे साडेतीनशे खेळ होणार आहेत, असे सांगून डॉ. जब्बार पटेल म्हणाले, यंदा प्रथमच पुण्याबरोबरच पिंपरी-चिंचवड शहरामध्येही हा महोत्सव विस्तारत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेने पुढाकार घेतला असून चिंचवड येथील ‘बिग सिनेमा’ येथे दोन स्क्रीनवर दररोज पाच खेळ दाखविण्यात येणार आहेत. महोत्सवातील चित्रपट पाहण्यासाठी प्रतिनिधी नोंदणी सुरू झाली असून http://www.piffindia.comया संकेतस्थळावर नोंदणी करता येईल. विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी ५०० रुपये आणि सर्वसाधारण प्रतिनिधींसाठी ७०० रुपये प्रतिनिधी शुल्क असेल.
संग्रहित लेख, दिनांक 14th Dec 2014 रोजी प्रकाशित
‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’त दोनशेहून अधिक चित्रपटांची पर्वणी
पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने ८ ते १५ जानेवारी या कालावधीत पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील ८ ठिकाणी १३ वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (पिफ) होणार आहे.
First published on: 14-12-2014 at 03:15 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 200 films in pune international film festival