‘‘राज्यातील रक्तपेढय़ांसमोर आज अनेक अडचणी आहेत. रक्तपेढय़ांना मिळणारी शासकीय मदतही तुटपुंजी आहे. या अडचणी शासकीय स्तरावरच सोडवण्याची आवश्यकता असून रक्तपेढय़ा सक्षम करण्याची गरज आहे. त्यासाठी शासनस्तरावर जे शक्य आहे ते करण्याचा निश्चितपणे प्रयत्न केला जाईल,’’ असे आश्वासन विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेता विनोद तावडे यांनी येथे दिले.
स्वामी विवेकानंदांच्या दीडशेव्या जयंती वर्षांनिमित्त कमल विश्व ट्रस्टतर्फे आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन तावडे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. या शिबिरात दोन हजार १६३ जणांनी रक्तदान केले. नगरसेवक हेमंत रासने यांनी या शिबिराचे आयोजन केले होते. उद्घाटन कार्यक्रमात संघाचे महानगर संघचालक शरदभाऊ घाटपांडे, भाजपचे शहराध्यक्ष अनिल शिरोळे, आमदार गिरीश बापट, चंद्रकांत पाटील, भीमराव तापकीर, नगरसेविका मुक्ता टिळक यांची प्रमुख उपस्थिती होती.
शंभरहून अधिकवेळा रक्तदान केलेल्या सात रक्तदात्यांचा या वेळी खास सत्कार करण्यात आला. तसेच दहावीच्या परीक्षेत ऐंशी टक्क्य़ांहून अधिक गुण मिळवलेल्या आणि वस्त्यांमध्ये राहणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार या वेळी करण्यात आला.