पुण्याच्या मावळ परिसरातील पाचाणे गावात तब्बल अडीचशे जणांना प्रसादातून विषबाधा झाल्याची घटना घडली. याठिकाणी शुक्रवारी पायबा महाराजांच्या उत्सवानिमित्त उरूसाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्रामस्थांना प्रसाद म्हणून पेढ्याचे वाटप करण्यात आले. हा प्रसाद खाल्ल्यानंतर रात्री साडेनऊच्या सुमारास अनेक ग्रामस्थांना उलटी, जुलाब आणि चक्कर येऊ लागली. त्यानंतर या गावकऱ्यांना तात्काळ उपचारासाठी औंध रुग्णालय, बढे रुग्णालय, पायोनियर रुग्णालय, पवना रुग्णालय आणि लहान-मोठ्या दवाखान्यांमध्ये दाखल करण्यात आले. दरम्यान, विषबाधितांमध्ये लहान मुलांची संख्या जास्त आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पाचाणे गावात १२ रुग्णवाहिका पाठविण्यात आल्या होत्या. तसेच डॉक्टरांचे एक विशेष पथकही पाचाणे गावात पाठविण्यात आले होते.
दरम्यान, तळेगाव पोलिसांनी याप्रकरणी देवळाबाहेरील एका पेढेवाल्याच्या दुकानातील माल जप्त केला आहे. याच पेढेवाल्याच्या दुकानातून अनेकजणांनी नैवेद्यासाठी पेढे विकत घेतले होते. हे पेढे खाल्ल्यानंतर थोड्यावेळातच लोकांना उलट्या, जुलाब आणि चक्कर येण्याचा त्रास जाणवू लागला. पोलिसांकडून जप्त करण्यात आलेला पेढ्यांचा साठा अन्न आणि औषध प्रशासनाच्या (एफडीए) हवाली करण्यात येणार आहे. एफडीएच्या अहवालानंतर पोलिसांकडून पुढील कारवाई केली जाईल.