scorecardresearch

राज्यात लम्पीमुळे २८ हजार जनावरांचा मृत्यू; त्वचारोग साथ सुरूच : गेल्या १७ दिवसांत साडेचार हजार पशुधनाची हानी

पशुसंवर्धन विभागाने दिलेल्या माहितीनुसार १७ डिसेंबरअखेर राज्यातील ३५ जिल्ह्यांतील ४०५१ केंद्रांमध्ये लम्पी रोगाचा संसर्ग झाला आहे

राज्यात लम्पीमुळे २८ हजार जनावरांचा मृत्यू; त्वचारोग साथ सुरूच : गेल्या १७ दिवसांत साडेचार हजार पशुधनाची हानी
राज्यात लम्पी त्वचारोगामुळे मृत्युमुखी पडलेल्या जनावरांची संख्या २८ हजारांवर पोहोचली आहे.

पुणे : राज्यात लम्पी त्वचारोगामुळे मृत्युमुखी पडलेल्या जनावरांची संख्या २८ हजारांवर पोहोचली आहे. गेल्या १७ दिवसांत ४,६८९ जनावरांचा मृत्यू झाला. जुलै महिन्याच्या अखेरीपासून युद्धपातळीवर उपचार करीत असलेल्या पशुसंवर्धन विभागाचे साथीवरील नियंत्रण आता सैल झाल्याचे चित्र आहे. 

पशुसंवर्धन विभागाने दिलेल्या माहितीनुसार १७ डिसेंबरअखेर राज्यातील ३५ जिल्ह्यांतील ४०५१ केंद्रांमध्ये लम्पी रोगाचा संसर्ग झाला आहे. बाधित गावांतील एकूण ३,९३,३३७ बाधित पशुधनापैकी ३,१६,५४० पशुधन उपचाराने बरे झालेले आहे. उर्वरित बाधित पशुधनावर उपचार सुरू आहेत. बाधितांपैकी २७,८५१ जनावरांचा मृत्यू झाला आहे.

 पशुसंवर्धन विभागाने नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला राज्यातील लम्पी त्वचारोगाची साथ नियंत्रणात आल्याचे जाहीर केले होते. मृत्युदरातही घट होत असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, गेल्या महिनाभरापासून राज्यात रोज सरासरी ३०० जनावरांचा लम्पीमुळे मृत्यू होताना दिसत आहे. पशुसंवर्धन विभागाकडून जाहीर करण्यात येणाऱ्या दैनंदिन प्रसिद्धी पत्रकातूनच ही बाब समोर आली आहे. १ डिसेंबर रोजी राज्यातील मृत जनावरांची संख्या २३,१६२ होती, ती १७ डिसेंबरअखेर २७,८५१ झाली आहे. गेल्या १७ दिवसांत दिवसांत ४,६८९ जनावरांचा मृत्यू झाला आहे.

शेतकऱ्यांच्या खात्यांवर ३८ कोटींची मदत जमा

लम्पीमुळे मृत्यू झालेल्या जनावरांच्या मालकांना राज्य सरकारने मदतीची घोषणा केली होती. त्यानुसार १७ डिसेंबपर्यंत १५,५४३ जनावरांच्या नुकसानभरपाईपोटी १४६१४ पशुपालकांच्या खात्यांवर ३८.८७ कोटी रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आजअखेर एकूण १४६.८२ लाख लसमात्रा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

साथ नियंत्रणाबाहेर का

* सलग चार महिन्यांच्या युद्धपातळीवरील कामांचा पशुसंवर्धन विभागावर ताण

* पशुसंवर्धन विभागाला आवश्यक सेवा-सुविधांचा तुटवडा 

* थेट जनावरांच्या गोठय़ात जाण्यासाठी आवश्यक वाहन व्यवस्थेचा अभाव

* सततच्या उपायांमुळे कंटाळलेल्या शेतकऱ्यांचाही उपचारासाठी प्रतिसाद मिळेना

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-12-2022 at 03:52 IST

संबंधित बातम्या