आयपीएल मधील हैदराबाद सनरायझर्स विरुद्ध राजस्थान या सामन्यावर बेटिंग घेणाऱ्या एका बुकीसह तिघांना वडगाव शेरी येथून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून बारा मोबाइल, दोन टीव्ही, एक लॅपटॉप असे एकूण एक लाख ३३ हजार रुपयांचे साहित्य जप्त केले आहे.
अहमद अब्दुल रहेमान खोजा ऊर्फ गुड्डू (वय ३४, रा. ब्रह्मा सनसिटी, वडगाव शेरी) असे अटक केलेल्या बुकीचे नाव आहे. तर बेटिंग लावणारे अझीम महंमदअली अझीयानी, हुसेन हादी सांगलीवाला (रा. दोघेही- पॅलेस व्हय़ू सोसायटी, कल्याणीनगर) आणि अल्ताफ श्रीमंतअली लखानी (वय ४६, एम्पिरियल रेसिडन्सी, कल्याणीनगर) अटक केलेल्या इतरांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमली पदार्थविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सुनील तांबे यांना खबऱ्याकडून माहिती मिळाली, की वडगाव शेरी येथील ब्रह्मा सनसिटी सोसायटीमध्ये गुड्डू नावाचा बुकी हैदराबाद सनरायझर्स विरुद्ध राजस्थान या सामन्यावर बेटिंग घेत आहे. त्यानुसार तांबे यांनी बुधवारी रात्री सापळा रचून बेटिंग खेळणारे अझीझ आणि हुसेन यांना ताब्यात घेतले. त्यानंतर बंद खोलीत बेटिंग घेणाऱ्या गुड्डूवर कारवाई केली. त्या वेळी नऊ मोबाइल, एक लॅपटॉप, दोन टीव्ही, दोन सेटटॉप बॉक्स असा एकूण एक लाख ३६ हजारांचा माल जप्त केला. या गुन्ह्य़ात बाबूभाई मिरचंदाणी, मुंबई येथील बुकी नंदू यांचा शोध सुरू आहे. गुड्डू हा मुंबई येथील बुकी असून गुड्डू हा त्याच्या संपर्कात होता. गुड्डूकडे चौकशी केल्यानंतर तो काहीच काम करत नसून आपीएलच्या सामन्यावर बेटिंग घेत असल्याचे समोर आले आहे.