पिंपरी पालिकेचे सेवानिवृत्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद जगदाळे यांच्यावर सेवाकाळातील विविध घोटाळ्यांना जबाबदार धरून कारवाई करण्याच्या प्रस्तावावरून सोमवारी पालिका सभेत ‘रणकंदन’ झाले. डॉ. जगदाळे यांच्या बचावासाठी सत्ताधारी राष्ट्रवादीने जीवाचे रान केले. तर, भाजप, शिवसेना, मनसे व इतरांनी तीव्र विरोध केला. या वादावादीमुळे सभागृहात प्रचंड गोंधळ झाला. दोन्हीकडून आरोप-प्रत्यारोप झाले, मानदंड पळवण्याचा प्रयत्न झाला. गोंधळातच शिस्तभंगाच्या कारणावरून शिवसेनेच्या गटनेत्या सुलभा उबाळे, नगरसेविका शारदा बाबर, आशा शेंडगे या तीन नगरसेविकांना आठ दिवसासाठी निलंबित केल्याची घोषणा करून महापौरांनी घाईने सभा तहकूब केली.
महापौर शकुंतला धराडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत डॉ. जगदाळे यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव मंजुरीसाठी होता. गेल्या काही महिन्याांासून तहकूब ठेवलेला  हा प्रस्ताव ‘निकाली’ काढण्याचा निर्णय सत्ताधारी राष्ट्रवादीने घेतला होता. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या बैठकीतही परस्पर मतप्रवाह निर्माण झाल्याने या विषयावरून बरीच वादावादी झाली होती. सोमवारी सभेत हा विषय चर्चेला आल्यानंतर विरोधी नगरसेवकांनी चर्चेची मागणी केली. तथापि, सत्ताधारी नेत्यांनी नकार दर्शविल्याने
विरोधी पक्षाचे नगरसेवक वाद घालू लागले. बोलू देत नाहीत म्हणून त्यांनी महापौरांच्या समोरील मानदंड पळवण्याचा प्रयत्न केला, त्यामध्ये मानदंडाचे नुकसान झाले. बराच वेळ गोंधळ सुरू असताना पक्षातील नेत्यांच्या सांगण्यावरून महापौरांनी गोंधळातच उबाळे, बाबर व शेंडगे यांच्यावर निलंबनाची कारवाई केल्याचे जाहीर केले. त्यानंतर, पुन्हा गदारोळ झाला. तथापि, महापौरांनी घाईने गुरूवापर्यंत (२३ जुलै) सभा तहकूब केली. या सगळ्या घडामोडीत नगरसचिवांची पंचाईत झाली. सभेतही त्यांना कसरत करावी लागत होती. महापौरांनी निलंबनाची कारवाई केल्यानंतर नगरसचिवांनी काढता पाय घेतला. काही वेळातच त्यांच्या कार्यालयाला कुलूप ठोकण्यात आल्याचे दिसून आले. ही कारवाई बेकायदेशीर असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली आहे. तर, संबंधित नगरसेविकांना तीन वेळा विनंती केली होती. मात्र, त्यांनी जुमानले नाही म्हणूनच त्यांच्यावर कारवाई करावी लागली, अशी सारवासारव महापौरांनी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महापौरांच्या खांद्यावर बंदूक
राष्ट्रवादीने सोमवारी एकाच दगडात अनेक पक्षी मारले. कशातही ‘अडकला’ तरी अधिकाऱ्यांचे संरक्षण आम्ही करतो, हा सूचक संदेश त्यांनी दिला. राष्ट्रवादीच्या विरोधात सातत्याने वातावरणनिर्मिती करणाऱ्या नगरसेवकांमध्ये सर्वाधिक आघाडीवर सुलभा उबाळे, शारदा बाबर, आशा शेंडगे यांच्यावर शिस्तभंगाच्या नावाखाली कारवाईचा बडगा उगारला. महापौरांच्या खांद्यावर बंदूक ठेवून ही कारवाई करण्यात आली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 3 corporators in pcmc suspended
First published on: 21-07-2015 at 03:22 IST