पुणे : शहरातील गंभीर गुन्हे, तसेच गस्त घालण्यासाठी तयार केलेल्या ‘काॅप्स २४’ पथकातील चौघा पोलीस कर्मचाऱ्यांनी मद्यप्राशन करुन गोंधळ घातल्याचा प्रकार उघडकीस आला. विश्रांतवाडी भागातील व्यावसायिकांना धमकाविल्याप्रकरणी चौघा पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस दलातून निलंबत करण्याचे आदेश गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी निलंबित करण्याचे आदेश दिले.

योगेश माळी, मुकेश वाळले, शंकर धोत्रे, कैलास फुपाटे अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. चौघे जण गुन्हे शाखेच्या ‘काॅप्स २४ ’ पथकात नियुक्तीस होते. मंगळवारी (११ नाेव्हेंबर) चैाघे जण विश्रांतवाडी भागात गस्त घालत होते. कर्तव्यावर असताना माळी, वाळले, धोत्रे, फुपाटे यांनी मद्यप्राशन केले होते.

मद्याच्या नशेत असलेल्या चैाघांनी विश्रांतवाडीतील काही दुकानदारांना शिवीगाळ केली. ‘आम्ही पोलीस आहोत. आमचे कोणी वाकडे करू शकत नाही. आमच्याकडे पैसे मागितले, तर तुन्हाला व्यवसाय करुन देणार नाही’, अशी धमकी देत चौघांनी दुकानदारांना धमकाविले होते. या घटनेनंतर या भागातील दुकानदारांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

दुसऱ्या दिवशी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात आलेले पोलीस कर्मचारी माळी, वाळले, धोत्रे, फुपाटे यांच्याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विचारणा केली. तेव्हा चौघांनी समाधानकारक उत्तरे दिली नाही. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक अनिल पाडेकर यांनी त्यांच्या वर्तनाची नोंद दैनंदिन कामकाजात (स्टेशन डायरी) केली. विश्रांतवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगेश हांडे यांनी कर्तव्यात कसुरी केल्याचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविला. त्यानंतर गुन्हे शाखेचे उपायुक्त निखिल पिंगळे यांनी त्यांची चौकशी केली.

चौकशीत त्यांचे गैरवर्तन समोर आले. त्यानंतर  त्यांना पोलीस दलातून निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले.  पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या संकल्पनेतून ‘काॅप्स २४’ या पथकाची निर्मिती करण्यात आली. या पथकाचे कामकाज गुन्हे शाखेच्या नियंत्रणाखाली सुरू असते. निलंबित करण्यात आलेले पोलीस कर्मचारी माळी, वाळले, धोत्रे, फुपाटे यांनी यापूर्वी कर्तव्यात कसुरी केली होती.

नेमून दिलेले काम न करणे, दैनंदिन हजेरीस उपस्थित न राहणे अशा प्रकारचे गैरवर्तन त्यांनी केले होते. याबाबत त्यांना समज देण्यात आली होती. त्यांच्या वर्तनात सुधारणा न झाल्याने त्यांना पोलीस दलातू निलंबित करण्यात आले. यापूर्वी गैरवर्तन केल्याप्रकरणी हडपसर भागातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते.