शहरातील विविध प्रकराच्या अतिक्रमणांवर गेल्या चार महिन्यात केलेल्या कारवाईचा अहवाल महापालिकेने जाहीर केला असून या कालावधीत पक्की व कच्ची बांधकामे तसेच शेड्स मिळून साडेचार लाख चौरसफूट बांधकाम पाडण्यात आल्याचे या अहवालात म्हटले आहे.
 महापालिकेचा अतिक्रमण निर्मूलन विभाग आणि अनधिकृत बांधकामांवर कारवाई करणाऱ्या विभागाकडून ३ नोव्हेंबर ते १५ मार्च या कालावधीत पक्की बांधकामे, शेडस्, कच्ची बांधकामे यांच्यावर कारवाई करण्यात आली. तसेच ठिकठिकाणी लागलेले बेकायदेशीर स्टॉलही उचलण्यात आले. त्या बरोबरच बेकायदा हातगाडय़ा, पथाऱ्या, नादुरुस्त वाहने आदींवरही कारवाई करण्यात आली. शहरात बेकायदेशीर जाहिरात फलक, नामफलक, फ्लेक्स, कापडी फलक आदींवरही कारवाई केली जात असून बेकायदा झोपडय़ांवरही कारवाई सुरू आहे. महापालिकेच्या पंधरा क्षेत्रीय कार्यालयांच्या नियंत्रणात ही कारवाई झाली.
या कारवाईत एक लाख ५० हजार ५८१ चौरसफुटांचे पक्के बांधकाम पाडण्यात आले. तसेच शेडस् व कच्ची बांधकामे मिळून तीन लाख तेरा हजार ७१४ चौरसफूट बांधकाम पाडण्यात आले. बेकायदा स्टॉलवरील कारवाईत ७७ स्टॉलवर कारवाई करण्यात आली असून २४४ हातगाडय़ाही उचलण्यात आल्या आहेत. तसेच ३५७ पथारी व्यावसायिकांवर कारवाई झाली. नादुरुस्त वाहने, शेडस्, रस्त्यावरील फर्निचर, भंगार माल आदींवरही कारवाई करण्यात आली. बेकायदा जाहिरात फलक, फ्लेक्स, नामफलकांवरही कारवाई करण्यात आली असून त्या अंतर्गत २३ होर्डिग, ६३७ फ्लेक्स आणि दोन हजार ३६५ अन्य फलकांवर कारवाई करण्यात आली. या कारवाया सुरू असताना विविध प्रकारचे साहित्यही जप्त करण्यात आले असून त्यात मोठय़ा संख्येने खुच्र्या, शेड, टेबल आदींचा समावेश आहे.