देहुरोड येथे राहणाऱ्या एका कुटुंबातील चार वर्षांच्या मुलीचे अपहरण या कुटुंबाशेजारीच राहणाऱ्या एका दाम्पत्याने केल्याचा प्रकार उघडकीस आला असून पोलिसांनी या मुलीची सुटका मोठय़ा शिताफीने छत्तीसगड येथून शुक्रवारी केली. चार वर्षांच्या या मुलीचे खंडणीसाठी अपहरण करण्यात आले होते. मुलीचे अपहरण करणाऱ्या दाम्पत्याला देहुरोड पोलिसांनी अटक केली आहे.
उदयराम गुहीराम बंजारी उर्फ उदय खाटकर (वय २९) आणि पूजा उदय बंजारी उर्फ खाटकर (वय ३५, रा. बिलाईनगर, छत्तीसगड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देहुरोड येथे राहणाऱ्या या कुटुंबाशेजारीच खाटकर दाम्पत्य राहते. त्यातून त्या दोघांनी या मुलीशी ओळख वाढवली. अधून-मधून ही मुलगी त्यांच्याबरोबर फिरण्यासाठी जात असे. २३ फेब्रुवारी रोजी सकाळी खाटकर दाम्पत्यानी या मुलीस सोमाटणे फाटा येथे फिरण्यासाठी घेऊन जातो असे सांगून घरातून नेले. रात्री उशीर झाला तरीही मुलगी घरी न आल्यामुळे तिच्या आईवडिलांनी खाटकर दाम्पत्याशी संपर्क केला. तेव्हा दुसऱ्या दिवशी तिला घेऊन येतो असे त्यांनी सांगितले. तीन दिवस झाले तरीही ते मुलीला घेऊन आले नाहीत आणि त्यांनी मोबाईलही बंद करून टाकला होता. त्यामुळे मुलीच्या पालकांनी याबाबत देहूरोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
दरम्यान आरोपींनी मुलीच्या पालकांना फोन करून ते नागपूर येथे असल्याचे सांगितले. मुलगी हवी असेल तर पैसे द्या अशी खंडणीची मागणी करून त्यांनी हे पैसे एका नातेवाइकाच्या खात्यात भरण्यास सांगितले. याप्रकरणी देहुरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम जाधव यांनी गुन्ह्य़ाचा तपास सुरू केला होता. त्यांनी मुलीच्या पालकांना आरोपींना पैसे देण्यात गुंतवून ठेवा असे सांगितले. तपासात पोलिसांना हे आरोपी छत्तीसगड येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक पोलिसांच्या मदतीने मुलीची सुटका करीत त्यांनी खाटकर दाम्पत्याला अटक केली. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक एस. एम. शिंदे, पोलीस कर्मचारी जे. सी. महाडीक, पी. एस. शिंदे यांनी सहभाग घेतला.