scorecardresearch

फुले स्मारकासाठी राज्य शासन पाच कोटींचा निधी देणार- मुख्यमंत्री

महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांची स्मारके जोडण्याच्या प्रकल्पासाठी राज्य शासनाकडून पाच कोटी रुपयांचा निधी दिला जाईल,अशी घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी केली.

महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांची स्मारके जोडण्याच्या प्रकल्पासाठी राज्य शासनाकडून पाच कोटी रुपयांचा निधी दिला जाईल. त्या दृष्टीने महापालिकेने आराखडा सादर करावा, अशी घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी केली.
पुणे महापालिकेच्या वतीने महात्मा फुले स्मारकाच्या जवळच उभारण्यात आलेल्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाचे उद्घाटन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते झाले. त्या वेळी मुख्यमंत्री बोलत होते. सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ, महापौर चंचला कोद्रे, खासदार अनिल शिरोळे, वंदना चव्हाण, आमदार गिरीश बापट,  रमेश बागवे, दीप्ती चवधरी, मोहन जोशी, उपमहापौर बंडू गायकवाड आदी त्या वेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, फुले स्मारक व सावित्रीबाईंचे हे स्मारक जोडले गेल्यानंतर हा प्रकल्प खऱ्या अर्थाने पूर्ण होईल. दोघांच्या जीवनातून प्रेरणा घ्यावी, अशी संकल्पना पालिकेने साकारली आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाकडून पाच कोटी रुपये दिले जातील. जोतिबा व सावित्रीबाईंनी ज्या काळात समाजसेवेचे धाडस केले, त्याची बरोबरी करता येणार नाही. महिला शिक्षण व समाजसुधारणेचे काम समाज विसरणार नाही. त्यामुळेच राज्य शासनाने पुणे विद्यापीठाला सावित्रीबाईंचे नाव दिले.
पवार म्हणाले की, समतेचा व आधुनिकतेचा विचार पुढच्या पिढीत येण्यासाठी हे स्मारक प्रेरणा देईल. जोतिबा फुले यांना आधुनिकतेची दृष्टी होती. समाजसेवक, द्रष्टे नेते व शेतीच्या जाणकाराबरोबरच व्यावसायाचा दृष्टिकोनही त्यांनी मांडला. सावित्रीबाई या स्वतंत्र कर्तृत्वाच्या होत्या. समाजातील शेवटच्या घटकाला शिक्षण मिळाले पाहिजे, ही त्यांची भूमिका होती. सावित्रीबाईं एक चांगल्या कवयित्री होत्या. त्यातून त्यांनी अंधश्रद्धेवरही प्रहार केला.
कर्तृत्ववान व्यक्तींना आपण विशिष्ट समाजापुरते मर्यादित ठेवतो, असे सांगून पवार म्हणाले की, शिवाजी महाराज, आंबेडकर, फुले, अण्णा भाऊ साठे आदी उत्तुंग व्यक्तिमत्त्वांना आपण एका विशिष्ट समाजाचे समजतो, असे का होते, याचा विचार जाणकारांनी करावा. या व्यक्तींची जयंती सर्वानी का साजरी करायची नाही. या  कर्तृत्ववान व्यक्ती सर्व समाजाच्या आहेत, ही गोष्ट रूजविली पाहिजे. 

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 5 cr for phule memorial

ताज्या बातम्या