पुणे : चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी रविवारी अपवाद वगळता शांततेत, सुरळीत आणि उत्साहाच्या वातावरणात मतदान पार पडले. नवोदित मतदारांसह युवक, युवती, पुरुष, महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग तसेच इतर मतदारांनी आज आपला मताधिकार बजावला असून या पोटनिवडणुकीसाठी ५०.४७ टक्के इतके सरासरी मतदान झाले, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मतदानाला सकाळी सात वाजता सुरुवात झाली होती. सकाळी नऊ वाजेपर्यंत ३.२५ टक्के मतदान झाले. सकाळी ११ वाजेपर्यंत १०.४५ टक्के, दुपारी एकपर्यंत २०.६८ टक्के, दुपारी तीन वाजेपर्यंत ३०.५५ टक्के, तर सायंकाळी पाच वाजेपर्यंत ४१.०६ टक्के मतदान झाले होते. अखेरच्या एका तासांत म्हणजेच सायंकाळी सहा वाजेपर्यंत ५०.४७ टक्के मतदान झाले. सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात ५५.८८ टक्के मतदान झाले होते. सकाळी आणि दुपारच्या सत्रात चिंचवडमध्ये मतदार फारसे बाहेर पडले नसल्याचे चित्र होते. मात्र, अखेरच्या टप्प्यांत मतदारांना मतदानासाठी घराबाहेर काढण्यात उमेदवारांना यश मिळाल्याचे दिसून आले.

हेही वाचा – Loksatta Pune Vardhapan Din 2023 : पोलीस दलाचे सक्षमीकरण गरजेचे

हेही वाचा – मतदान कालावधी संपला, कसब्यात रांगाच रांगा; मतदानाची टक्का वाढणार का?

चिंचवड विधानसभा या मतदारसंघामध्ये एकूण पाच लाख ६८ हजार ९५४ मतदार आहेत. एकूण ५१० मतदार केंद्रांवर मतदान झाले. यापैकी मतदारसंघातील २५५ मतदान केंद्रांवर चित्रीकरणाच्या सहाय्याने लक्ष ठेवण्यात आले होते. निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी थेरगाव येथील शंकरआण्णा गावडे कामगार भवनमध्ये नियंत्रण कक्ष उभारण्यात आला होता. या कक्षातून संपूर्ण मतदान प्रक्रियेवर, तसेच यंत्रणेवर निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले लक्ष ठेवून होते. कोणत्याही मतदार केंद्रावर उद्भवलेल्या अडचणी सोडवण्यासाठी, तसेच मदतीसाठी शीघ्र कृती दलाचे ( क्विक रिस्पॉन्स टीम ) सात पथके कार्यरत होती. ईव्हीएममध्ये तांत्रिक अडचण उद्भवल्यास शीघ्र कृती दल तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन निर्माण झालेली तांत्रिक अडचण दूर करत होते. त्यामुळे मतदान प्रक्रियेला कुठेही बाधा आली नाही. प्रत्येक केंद्राच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यासाठी ३७०७ पोलीस कर्मचारी व ७२५ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यान, मतदान प्रक्रिया संपल्यानंतर थेरगाव येथील शंकरआण्णा गावडे कामगार भवन येथे मतदान साहित्य जमा करण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 50 47 percent voting for chinchwad byelection pune print news psg 17 ssb
First published on: 26-02-2023 at 22:25 IST