साडेतीन वर्षांपासून भरती रखडली

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : महापालिका अग्निशमन दलातील भरती प्रक्रिया गेल्या साडेतीन वर्षांपासून रखडली असून दलातील मंजूर ९१० पदांपैकी ५२७ पदे रिक्त असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. शहराचा विस्तार आणि सुरक्षितता याचा विचार करताना सेवेतील पदे दीर्घकाळ रिक्त ठेवणे धोक्याचे ठरणार आहे.

अहमदनगर जिल्हा रुग्णालयाला लागलेल्या आगीच्या घटनेनंतर अग्निसुरक्षा हा विषय ऐरणीवर आला आहे. या प्रकारच्या घटना घडू नयेत आणि दुदैवाने घडल्या, तरी कमीत कमी हानी व्हावी यासाठी महापालिकेच्या अग्निशमन दलात सुयोग्य आणि पुरेसे कर्मचारी असणे आवश्यक आहे. या पाश्र्वभूमीवर सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी ही धक्कादायक बाब उघडकीस आणली आहे. गेल्या साडेतीन वर्षांपासून अग्निशमन दलाकडील ५५ टक्के  पदे रिक्त असून भरतीसाठीची नियमावली मंजुरीसाठी नगरविकास विभागाकडे प्रलंबित आहे. मात्र त्यासाठी कोणताही पाठपुरावा महापालिकेकडून होत नसल्याचे वास्तव यानिमित्ताने पुढे आले आहे.

अग्निशमन दलातील अधिकारी आणि कर्मचारी यांची भरती करण्यासाठी आदर्श सामायिक सेवा प्रवेश नियमावली राज्यातील अग्निशमन सेवा संचालनालयाने मार्च २०१८ मध्ये तयार केली. ही नियमावली नगरविकास मंत्रालयाकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आली आहे. मात्र तीन वर्षांपासून त्याला मंजुरी मिळू शकलेली नाही. त्याचा परिणाम महापालिकेतील अग्निशमन दलातील भरती प्रक्रियेवर झाला आहे, असे वेलणकर यांनी सांगितले. या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वेलणकर यांनी निवेदन पाठविले आहे. महापालिकेच्या अग्निशमन दलासाठी ९१० मंजूर पदे आहेत. त्यापैकी ५२७ पदे रिक्त आहेत.  ही बाब महापालिका आयुक्तांनीही नगरविकास मंत्रालयाच्या प्रधान सचिवांना कळविली आहे. मात्र त्याबाबत नगरविकास मंत्रालयाकडून कोणताही निर्णय घेतला जात नाही. त्यामुळे विभागाच्या प्रधान सचिवांना नियमावली तातडीने मंजूर करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी द्यावेत आणि तीन वर्षे मंजुरी प्रलंबित ठेवणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी वेलणकर यांनी केली आहे.

ही रिक्त पदे

उपमुख्य अग्निशमन अधिकारी, विभागीय अग्निशमन अधिकारी, सहायक विभागीय अग्निशमन अधिकारी, अग्निशमन केंद्र अधिकारी, सहायक अग्निशमन अधिकारी, प्रमुख अग्निशमन विमोचक (तांडेल), अग्निशमन विमोचक (फायरमन), यंत्रचालक, रुग्णवाहिका चालक, रुग्णवाहिका परिचारक, मदतनीस (हेल्पर), निरीक्षक (बिनतारी संदेश विभाग), कार्यदेशक (वाहन-अ‍ॅटो फोरमन),  कनिष्ठ रेडिओ टेक्निशिअन, प्रमुख मोटार मेकॅनिक (यांत्रिक), फिटर, हेक्सा ऑपरेटर, फायल प्लग मोकादम, प्रशासन अधिकारी, वरिष्ठ लपिक, लिपिक टंकलेखन, शिपाई, सुरक्षा रक्षक अशी मिळून ५१० रिक्त पदे आहेत. आजमितीस केवळ ४०० अधिकारी आणि कर्मचाऱ्यावर शहराच्या सुरक्षिततेची जबाबदारी आहे.

शहरात वर्षभरात सीरम इन्स्टिटय़ूट , फॅशन स्ट्रीट येथे मोठय़ा आगीच्या घटना घडून गेल्या आहेत.  शहराचा विस्तार आणि शहराची सुरक्षितता विचारात घेता अग्निशमन  सेवेतील पदे दीर्घकाळ रिक्त ठेवणे अडचणीचे आहे. मात्र रिक्त जागा भरल्या जात नाही, हे दुर्दैव आहे.

विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 527 posts fire brigade vacant ysh
First published on: 09-11-2021 at 02:56 IST