पुणे : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०मध्ये स्थानिक भाषा, मातृभाषेतून शिक्षणाला प्राधान्य देण्यात आले आहे. त्या अनुषंगाने एनसीईआरटीने देशभरातील ५४ स्थानिक भाषांत पूर्वप्राथमिक ते दुसरीपर्यंतचा अभ्यासक्रम तयार करून प्रसिद्ध केला आहे. या भाषांमध्ये राज्यातील खान्देशी भाषेचाही समावेश असून, या खान्देशी अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना खान्देशी भाषेतील अक्षरे, शब्द आणि अंकांचे उच्चार, लेखन शिकता येणार आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० आणि राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २०२२मध्ये तीन ते आठ या वयोगटांतील मुलांना त्यांच्या मातृभाषा, घरात बोलली जाणारी भाषा, प्रादेशिक भाषेत शिक्षण देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आदिवासीबहुल भागातील मुलांना वर्गशिक्षण पद्धती समजू शकत नसल्याचा परिणाम त्यांच्या शिक्षणावर होतो. त्यामुळे केंद्र सरकारने ३ ते ५ या वयोगटांतील मुलांना, पहिली ते दुसरीच्या मुलांना प्राथमिक स्तरावर मुलभूत साक्षरता देण्याची व्यवस्था केली आहे. त्यात स्थानिक लोकगीते, कथांच्या माध्यमातून मौखिक भाषा विकसित करण्यावर भर देण्यात आला आहे.

हेही वाचा >>>सलमान खान गोळीबार प्रकरण : भावाला दूरध्वनी केल्यामुळे आरोपी सापडले

पुस्तकातील कथा, चित्रे, संवाद याद्वारे हे केले जात आहे. वाचन आणि लेखनाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी, मुलांच्या सोयीसाठी खान्देशी भाषेतील गाणी, शब्द, अक्षरे देण्यात आली आहेत. त्यामुळे मुलांना त्यांच्या मातृभाषेतून मराठी ध्वनि आणि लिपी शिकता येईल. मातृभाषेतील उपलब्ध अक्षरे आणि मातृभाषेत नसलेली मराठी अक्षरे एकत्र करून खान्देशी भाषा शिक्षण प्रवेशिका हे पुस्तक तयार करण्यात आले आहे. या पुस्तकाद्वारे ध्वनिची ओळख तसेच वर्णमालेची ओळख होण्यास मदत होणार आहे.

वेगळेपण काय

 खान्देशी भाषा शिक्षण प्रवेशिका या पुस्तकानुसार खान्देशी भाषेतील अक्षरे, शब्द, अंक देण्यात आले आहेत. उदाहरणार्थ, अ अऊत (नांगर), आ आकटी (शेकोटी), इ इज (वीज), ई इस्तो (विस्तव), ऐ ऐना (आरसा) अशा पद्धतीने अक्षरे शिकवली जातील. तर यक (एक), सऊ (सहा), दा (दहा), आकरा (अकरा), सोया (सोळा) अशा पद्धतीने अंक शिकवले जाणार आहेत. तसेच कविता, चित्रेही देण्यात आली आहेत.