लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथील घराजवळ गोळीबार करणाऱ्या आरोपींनी त्याच्या भावाशी संपर्क साधल्यामुळे त्यांचा नवा मोबाईल क्रमांक पोलिसांना सापडला. तंत्रज्ञानाच्या मदतीने पुढे भूजमधील आरोपींची ठिकाण सापडल्याची माहिती सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे गुन्हे शाखेच्या पाठोपाठ भूज येथील आरोपींच्या ठिकाणावर काही काळाने पश्चिम प्रादेशिक विभागातील पोलिसांचे पथकही पोहोचले.

सलमानच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी विकी साहब गुप्ता आणि सागर श्रीजोगेंद्र पाल यांना अटक केली. त्यातील पाल याने अद्ययावत पिस्तूलाने सलमानच्या घराबाहेर गोळीबार केला तर गुप्ता मोटारसायकल चालवत होता. त्यातील पाल हा अनमोल बिष्णोईच्या थेट संपर्कात होता. गोळीबार केल्यानंतर त्यांनी दुचाकी माऊंटमेरी परिसरात सोडली. त्यानंतर त्यांचे मोबाईल फोनही नष्ट केले व नवे मोबाईल क्रमांक वापरू लागले. त्यातील एका आरोपीने त्याच्या भावाशी नव्या मोबाईल क्रमांकावरून संपर्क साधला आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांना आरोपींचे नवे मोबाईल क्रमांक मिळाले. त्यानंतर तंत्रज्ञानाच्या मदतीने दोन्ही आरोपी गुजरातमध्ये असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार गुजरातमधील भुज येथून त्यांनी आरोपींना अटक केली. विशेष म्हणजे गुन्हे शाखेसोबत पश्चिम प्रादेशिक विभागाचे पथकही आरोपींच्या मागावर होते. गुन्हे शाखेने अटक केल्यानंतर काही वेळातच पश्चिम प्रादेशिक पोलिसांचे पथकही आरोपींच्या शोधात भुज येथे पोहोचले होते.

आणखी वाचा-मुंबई : आठ महिन्यांनंतरही अभियांत्रिकीचे विद्यार्थी गुणपत्रिकेच्या प्रतीक्षेत

गोळीनंतर वांद्रे पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला. त्याचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. गुन्हे शाखेने १२ पथके तयार केली. गुन्हे शाखेची काही पथके, बिहार, हरियाणा या ठिकाणी रवाना झाली होती. पण आरोपींना गोळीबार केल्यानंतर उत्तर भारतात न येण्याच्या सूचना त्यांच्या म्होरक्यांनी दिल्या होत्या. त्यामुळे बिहार व हरियाणाऐवजी ते गुजरातमध्ये गेले.

बिष्णोई टोळीकडून खर्चासाठी ५० हजार

सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करण्यासाठी अनमोल बिष्णोईने आरोपी सागर पालला ५० हजार रुपये पाठवून दिले होते. यूपीआयच्या माध्यमातून ही रक्कम पाठवण्यता आली होती. त्यातील २४ हजार रुपयांत त्यांनी दुचाकी खरेदी केली. त्याशिवाय १० घरांसाठी अनामत रक्कम व ३४०० प्रति महिना भाडे असा ११ महिन्यांचा भाडे करार केला. गोळीबारात वापरण्यात आलेले अद्ययावत पिस्तुल त्यांना पनवेलमध्ये बिष्णोई टोळीच्या हस्तकामार्फत पुरवण्यात आले होते.