पुणे : शहराला पाणीपुरठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांमध्ये मिळून एकूण ६.२० अब्ज घनफूट (टीएमसी) एवढा पाणीसाठा आहे. चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसांत तुरळक पावसाची नोंद जलसंपदा विभागाकडून करण्यात आली आहे. दरम्यान, गेल्या वर्षीच या दिवशी धरणात ६.१४ टीएमसी एवढा पाणीसाठा होता.
खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चारही धरणांतून शहराला पाणीपुरवठा केला जातो. टेमघर धरणात ०.३० टीएमसी, वरसगाव धरणात २.८६, पानशेतमध्ये १.९७, तर खडकवासला धरणात ०.८८ टीएमसी असा मिळून एकूण ६.२० टीएमसी एवढा पाणीसाठा असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.
गेल्या दोन दिवसांत टेमघरमध्ये २३ मिलिमीटर, वरसगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १२ मिलिमीटर पावसाची तर, पानशेत आणि खडकवासला धरणांच्या क्षेत्रात अनुक्रमे १५ आणि १६ मिलिमीटर पाऊस झाल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची नोंद झाली असला तरी, पाणीसाठ्यात कोणतीही वाढ झालेली नाही. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा धरणांमध्ये किंचित जास्त पाणीसाठा आहे, अशी माहितीही जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.