दावणीच्या खुंटय़ा तोडून बेफाम होऊन उधाळलेल्या म्हशीने बेल्हे येथील आठवडे बाजारात सकाळी धुमाकूळ घालत एका हॉटेलसह वडापावच्या गाडीचे नुकसान करीत सहा जणांना जखमी केले. तरुणांनी मोठय़ा शिताफीने फास टाकत म्हशीला पकडून झाडाला बांधले. यामुळे अर्धा तास बाजाराच चांगलीच धावपळ उडाली आणि त्यानंतर सुद्धा या प्रकाराची चर्चा सुरू राहिली.
बेल्हे येथे प्रत्येक सोमवारी आठवडे बाजार भरतो. नेहमीप्रमाणे बाजार सुरू असताना बाजाराच्या शेजारीच असलेल्या एका शेतकऱ्याच्या म्हशीने सकाळी अकराच्या सुमारास दावणीच्या खुंटय़ा तोडून बेफाम उधळण्यास सुरुवात केली. नागरिकांनी तिला पकडण्यासाठी पाठलाग सुरू केला. पण, बेफाम झालेल्या म्हैस बाजारात एका हॉटेलमध्ये घुसली. त्यामुळे या हॉटेलमध्ये बसलेल्या ग्राहकांची चांगलीच धांदल उडाली आणि सर्व जण पळू लागले. म्हैस हॉटेलमध्ये घुसल्यामुळे येथील साहित्याचे नुकसान झाले. त्यानंतर म्हशीने शहरातील मुख्य रस्त्याकडे मोर्चा वळविला. या वेळी मोहन बांगर या तरुणाने धाडस करून म्हशीला पकडण्याचा प्रयत्न केला. पण, बघ्याच्या गर्दीमुळे गोंधळलेल्या म्हशीने मात्र बांगर याचे प्रयत्न हाणून पाडत त्याला तीन वेळा शिंगावर घेऊन खाली आपटले. यामध्ये तो चांगलाच जखमी झाला.
त्या ठिकाणाहून म्हशीने बाजारातील मुख्य गर्दीकडे धाव घेतली. त्या ठिकाणी मोटारसायकलवर उभ्या असलेल्या टी. एल. गुंजाळ यांना जखमी केले. त्यानंतर शेतीची अवजारे विक्रीसाठी घेऊन बसलेल्या विलास औटी यांना जखमी करून त्यांच्याजवळील शेतीच्या अवजारांची नासधूस केली. या ठिकाणाहून पळताना म्हशीची नाथा बनकर यांच्या वडापावच्या गाडीला धडक बसली. वडापाव गाडीचे मोठे नुकसान झाले. त्या ठिकाणाहून पुढे पळणाऱ्या म्हशीने आणखी तिघांना जखमी केले. या वेळी बेल्हे गावच्या तरुण ग्रामस्थांनी मोठय़ा शिताफीने, दोरखंडाचे फास टाकत म्हशीला पकडले. जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. म्हैस पकडण्यात यश आल्याने, बाजारातील अनर्थ टळल्याचे बोलले जाते. मात्र, या प्रकारामुळे अर्धा तास बाजारात चांगलाच गोंधळ उडाला होता. म्हशीला पकडल्यानंतर त्याचीच चर्चा सुरू होती.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Dec 2014 रोजी प्रकाशित
उधळलेल्या म्हशीकडून मोठे नुकसान, सहा जण जखमी
दावणीच्या खुंटय़ा तोडून बेफाम होऊन उधाळलेल्या म्हशीने बेल्हे येथील आठवडे बाजारात सकाळी धुमाकूळ घालत एका हॉटेलसह वडापावच्या गाडीचे नुकसान करीत सहा जणांना जखमी केले.

First published on: 02-12-2014 at 03:20 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 6 injured in buffalo attack