पिंपरी : मालमत्ता कर आणि पाणीपट्टीत कोणतीही करवाढ-दरवाढ नसलेला पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा मूळ पाच हजार २९८ कोटी ३१ लाख, तर केंद्र, राज्य सरकारच्या पुरस्कृत योजनांसह सात हजार १२७ कोटी ८८ लाख रुपयांचा अर्थसंकल्प मंगळवारी सादर झाला.
७१८ कोटी ६८ लाखांचा शिलकीचा अर्थसंकल्प आहे. यंदाचा अर्थसंकल्प फुगीर असून गतवर्षीपेक्षा ६३१ कोटींनी अधिकचा आहे. अर्थसंकल्पात जुन्या योजना मार्गी लावण्यावर भर दिला आहे. अर्थसंकल्पाला प्रशासकांनी तत्काळ मान्यता दिली. महापालिकेत प्रशासकीय राजवट सुरू आहे. त्यामुळे मुख्य लेखा व वित्त अधिकारी जितेंद्र कोळंबे यांनी मंगळवारी प्रशासक शेखर सिंह यांना अर्थसंकल्प सादर केला. आयुक्तांनी तात्काळ अर्थसंकल्पाला मंजुरी दिली. एक एप्रिलपासून अर्थसंकल्पाची अंमलबजावणी होईल. अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, प्रदीप जांभळे, उल्हास जगताप यावेळी उपस्थित होते. आयुक्त सिंह यांचा पहिला, तर महापालिकेचा हा ४१ वा अर्थसंकल्प आहे.