आंबे पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाइडचा वापर केल्याबद्दल कसबा पेठातील एका आंबे विक्रेत्याकडून ७०६ डझन हापूस आंबे जप्त करण्यात आले आहेत. अन्न प्रशासन आणि फरासखाना पोलिस ठाणे यांनी संयुक्त रीत्या ही कारवाई केली आहे.
अन्न प्रशासनाचे सहायक आयुक्त शिवाजी देसाई यांनी ही माहिती दिली. कसबा पेठेतील कुदळे विठ्ठल मंदिराजवळ असणाऱ्या आंब्यांच्या गोडाऊनमधून हे आंबे जप्त करण्यात आले आहेत. या आंब्यांची किंमत एक लाख तेवीस हजार रुपये असून त्याबरोबर पंधरा किलो कॅल्शियम कार्बाइडचा साठाही जप्त करण्यात आला आहे. फरासखाना पोलिस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक गीता भागवडे, अन्न सुरक्षा अधिकारी विजय उनवणे, रमाकांत कुलकर्णी यांनी ही कारवाई केली आहे.