पिंपरी : ‘ज्ञानेश्वर माउली, ज्ञानराज माउली तुकाराम’ जयघोषात आणि लाखो भाविकांच्या उपस्थितीत श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा ७२९ वा संजीवन समाधी सोहळा भक्तिमय वातावरणात सोमवारी झाला.
प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ महाराज यांच्या हस्ते महापूजा झाली. महापूजेसाठी विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप, चैतन्य महाराज कबीर, डॉ. भावार्थ देखणे, पुरुषोत्तम पाटील, ॲड. रोहिणी पवार, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर आदी उपस्थित होते. पहाटे पाच ते साडेनऊ ही वेळ भाविकांच्या महापूजेसाठी ठेवण्यात आली होती. सकाळी सात ते नऊ या वेळात हैबतबाबा पायरीपुढे ह.भ.प हैबतबाबा आरफळकर यांचे कीर्तन झाले. सकाळी सात ते नऊ या वेळात भोजलिंग मंडपात दाणेवाले निकम दिंडी यांचे कीर्तन झाले. सकाळी नऊ ते बारा या वेळात ह.भ.प नामदास महाराज यांचे समाधी सोहळ्याचे कीर्तन रंगले. सकाळी नऊनंतर महाद्वार काला कीर्तन झाल्यानंतर हैबतबाबा दिंडीची समाधी मंदिर प्रदक्षिणा झाली. दुपारी बारा वाजता संजीवन समाधी दिनानिमित्त घंटानाद, पुष्पवृष्टी, माउलींची भक्तिभावात भाविकांच्या उपस्थितीत आरती करण्यात आली.
इंद्रायणीकाठी टाळ मृदंगाचा गजर
आळंदीत माउलींच्या समाधी सोहळ्यात उपस्थित राहण्यासाठी राज्यातील विविध भागांतून भाविक दाखल झाले आहेत. कीर्तन, भजनाचे सुश्राव्य स्वर सर्वत्र ऐकू येत आहेत. आळंदीत भक्तांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. इंद्रायणीत स्नान करून भाविक टाळ-मृदंगाचा गजर करत आहेत. इंद्रायणी काठी भाविकांचा मेळा पाहायला मिळत आहे. लाखो भाविक या सोहळ्याचे साक्षीदार झाले. माउलींचे दर्शन घेण्याकरिता दर्शनरांगेत गर्दी झाली होती.
अलंकापुरी भक्तिरसात न्हाऊन निघाली
महाराष्ट्रभरातून लाखो भाविक समाधी सोहळा याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी आळंदीत आले आहेत. समाधी सोहळ्यानिमित्त आळंदीत ठिकठिकाणी भाविकांनी हरिनामाचा गजर केला. टाळ-मृदंगाच्या स्वरात कीर्तन रंगले. भाविकांसाठी यावेळी दर्शनबारीची सोय केली होती. त्यामुळे शिस्तीत भाविकांना दर्शन घेता आले. भाविकांना रांगेतच पाणी, खाद्यपदार्थ यांची सोय प्रशासनाच्या वतीने केली होती. मोठ्या संख्येने भाविकांनी माउलींच्या दर्शनाचा लाभ घेतला. राज्यभरातून ७५० दिंड्या आळंदीत दाखल झाल्या आहेत. भाविकांच्या सुरक्षेसाठी २६५ सीसीटीव्ही कॅमेरे आळंदीत लावण्यात आले आहेत.
