प्रशासकीय अधिकारात राजेश पाटील यांचा निर्णय

पिंपरी : पिंपरी महापालिकेच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या नदीपुनरुज्जीवन प्रकल्पाअंतर्गत ७५० कोटी रुपये खर्च करण्यास प्रशासक व आयुक्त राजेश पाटील यांनी मान्यता दिली आहे. शहर हद्दीतील १४ किलोमीटर अंतरासाठी हा खर्च करण्यात येणार आहे. स्थायी समितीने मान्यता दिल्यानंतर पालिका सभेच्या मान्यतेसाठी हा प्रस्ताव रखडला होता. प्रशासक म्हणून मिळालेल्या अधिकारात आयुक्तांनी या प्रकल्पास मान्यता दिली आहे.

पिंपरी-चिंचवड शहराच्या हद्दीतून वाहणाऱ्या मुळा नदीच्या १४.२० किमी अंतरासाठी नदी पुनरुज्जीवन प्रकल्प राबवण्यात येणार आहे. यासाठी प्रकल्प सल्लागाराने तयार केलेल्या पूर्वगणकानुसार सुमारे ७५० कोटी खर्च होणार आहे. खासगी सहभागातून हा निधी उभारण्यात येणार आहे. पाच वर्षांत पूर्ण करावयाच्या या प्रकल्पासाठी आयुक्तांना अंमलबजावणी प्राधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले असून सर्व वित्तीय अधिकारांसह प्रकल्प राबवण्याचे सर्व अधिकार आयुक्तांना देण्यात आले आहे. याबाबतचा संपूर्ण प्रस्ताव १६ फेब्रुवारीला झालेल्या स्थायी समितीच्या सभेत कोणतीही चर्चा न करता मंजूर करण्यात आला होता. या प्रस्तावास पालिका सभेची अंतिम मान्यता आवश्यक होती. मात्र, त्यानंतर सभाच झाली नाही. १३ मार्चला पिंपरी पालिकेची मुदत संपली. दुसऱ्याच दिवसापासून आयुक्त पाटील यांची प्रशासक म्हणून नियुक्ती झाली. सभेच्या मान्यतेसाठी रखडलेला हा प्रस्ताव आयुक्तांनी बुधवारी काही क्षणात मंजूर केला.

आतापर्यंतचा कोटय़वधींचा खर्च म्हणजे पालथ्या घडय़ावर पाणी?

शहरातील नद्यांमध्ये मृत मासे आढळणे, मोठय़ा प्रमाणात जलपर्णी साठणे, प्रक्रिया न केलेले सांडपाणी सोडणे, कंपन्यांचे दूषित पाणी नद्यांमध्ये सोडणे अशा अनेक मार्गानी नदीपात्र प्रदूषित झाल्याचे शहरवासीयांनी वेळोवेळी पाहिले आहे. नदीचे पात्र बुजवण्याचेही अनेकदा प्रयत्न झाले आहेत. महापालिकेने आतापर्यंत नदीसुधार योजनांच्या नावाखाली कोटय़वधी रुपये खर्च केले. मात्र, नद्यांमध्ये कोणतीही सुधारणा न झाल्याने हा खर्च म्हणजे पालथ्या घडय़ावर पाणी आहे का, असा मुद्दा उपस्थित करण्यात येतो. आजही नद्यांची अवस्था गटारांसारखी आहे. या कामात पालिकेचे अधिकारी, ठेकेदार आणि प्रमुख राजकीय नेत्यांनी मिळून संगनमताने पालिकेची लूट केल्याचे बोलले जाते. या पार्श्वभूमीवर, मुळा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी नव्याने ७५० कोटी खर्च केले जाणार आहेत.