राज्यातील शाळांनी वर्षभरात रविवार वगळता ७६ पेक्षा अधिक सुट्टय़ा घेऊ नयेत, असे आदेश शिक्षण विभागाने काढले असून पाच दिवसांचा आठवडा असणाऱ्या शाळांना पुन्हा एकदा इशारा दिला आहे.
शिक्षण हक्क कायद्यानुसार पहिली ते पाचवीपर्यंतच्या शाळा किमान २०० दिवस आणि सहावी ते आठवीपर्यंतच्या शाळा किमान २२० दिवस सुरू राहणे आवश्यक आहे. त्यानुसार रविवार वगळता राज्यातील शाळांना आता ७६ दिवसच सुट्टी घेता येणार आहे. उन्हाळा, दिवाळी, नाताळ, शासकीय सुट्टय़ा, जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकारातील सुट्टय़ा हे सर्व सुट्टय़ांचे गणित शाळांना ७६ दिवसांमध्ये बसवावे लागणार आहे. अल्पसंख्याक शाळांसहीत सर्व प्रकारच्या, माध्यमाच्या आणि बोर्डाच्या शाळांना हा नियम लागू असल्याचे शिक्षण विभागाने म्हटले आहे. या नियमाच्या अंमलबजावणीबाबत शिक्षण विभागाने राज्यातील सर्व शिक्षण अधिकाऱ्यांना इशारा दिला आहे. पाच दिवसांचा आठवडा असलेल्या शाळांना विभागाने एकप्रकारेपुन्हा एकदा इशारा दिला आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार सुट्टय़ांचा निर्णय घेण्यात आला असल्याचे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.