तीन दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या घारीला अग्निशमन दलाकडून जीवदान

४० फुटावरून मांज्याच्या विळख्यातून अडकलेल्या घारीची सुखरूप सुटका

चंद्रकांत गायकवाड यांनी अग्निशमन दलाच्या जवानांनी याची माहिती दिली आणि अग्निशमनच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत दुपारी ४० फुटावरून मांज्याच्या विळख्यातून अडकलेल्या घारीची सुखरूप सुटका केली.

कासारवाडीच्या (पिंपरी-चिंचवड) परिसरातील पिंपळाच्या झाडावर पतंगाच्या धारदार मांज्यात अडकल्याने गेल्या तीन दिवसांपासून एक घार लटकत होती. तिला जखमा झाल्याने जिवाच्या आकांताने ओरडत होती. मात्र तिच्याकडे कोणी लक्ष दिले नाही. शेजारीच राहणाऱ्या एका पक्षीप्रेमी व्यक्तीने याची माहिती अग्निशमन विभागाला दिली आणि अवघ्या अर्ध्या तासात या घारीला जीवनदान मिळाले. चंद्रकांत गायकवाड यांनी ही तत्परता दाखवत पक्षी प्रेम दाखविले आहे. त्यामुळे त्यांचे कौतुक होताना दिसत आहे.

कासारवाडी येथील भंडारी पेट्रोल पंपाशेजारी पिंपळाचे मोठे झाड आहे. गेल्या तीन दिवसांपासून येथील झाडावर पक्षी अडकला असल्याचे गायकवाड यांच्या लक्षात आले. मात्र झाड खूप उंच असल्याने त्यांना घारीला काढता येत नव्हते. अनेक वेळा त्यांनी प्रयत्न देखील केला. घार झाडावर लटकून जिवाच्या आकांताने ओरडत होती. गेल्या तीन दिवसांपासून तिच्या पोटात अन्नाचा कणही नव्हता. त्यात ती मांज्यामधून सुटण्याचा प्रयत्न करत होती. त्यात ती आणखी गुंतत गेली आणि जखमी झाली. गायकवाड यांनी अग्निशमन दलाच्या जवानांनी याची माहिती दिली आणि अग्निशमनच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत दुपारी ४० फुटावरून मांज्याच्या विळख्यातून अडकलेल्या घारीची सुखरूप सुटका केली. घारीला प्राणीमित्रांकडे सोपवून तिच्यावर उपचार करण्यात येणार आहेत, अशी माहिती अग्निशमन दलाने दिली. श्रावण चिमटे, नवनाथ शिंदे, लक्ष्मण होवाळे, विवेक खंडेवाड, रामदास गर्जे, विशाल पोटे आणि सूरज गवळी यांच्या टीमने घारीला वाचवण्यात मोलाची भूमिका निभावली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: A bird congest on tree fire brigade save life