पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना, मुळा आणि इंद्रायणी या तीन नदी पात्रातील जलपर्णी काढण्याची ठेकेदारांची मुदत संपण्यास अवघे सहा दिवस शिल्लक असतानाही पात्रात जलपर्णी ‘जैसे थे’ आहे. त्यामुळे जलपर्णी काढण्यासाठीचे चार कोटी रुपये पाण्यात जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहरातून पवना, इंद्रायणी आणि मुळा या तीन नद्या वाहतात. पवना नदीचे पात्र २४ किलोमीटर, इंद्रायणीचे १९ आणि मुळा नदीचे १० किलोमीटर आहे. या तीन नद्यांमधील जलपर्णी काढण्याचे कामकाज ठेकेदारांना देण्यात आले. पवना नदीतील सांगवडे ते मोरया गोसावी बंधारा या एकूण ९.९६ किलोमीटर आणि मोरया गोसावी बंधारा ते कासारवाडी दत्त मंदिर (सृष्टी चौक, पिंपळे-गुरव ब्रीज) या ९.६७ किलोमीटर क्षेत्रातील जलपर्णीचे काम शुभम उद्योग समूहाला देण्यात आले.

हेही वाचा >>>पुण्यातील टिंबर मार्केटमधील लाकडाच्या गोडाऊनला भीषण आग, सात दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी

पवना व मुळा नदीपात्रातील कासारवाडी दत्त मंदिर (सृष्टी चौक, पिंपळे-गुरव ब्रीज) ते बोपखेल बंधारा या ९.६७ किलोमीटर अंतरातील जलपर्णीचे काम तावरे फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्विसेस यांना देण्यात आले आहे. मुळा नदीपात्रातील वाकड ब्रीज सूर्या हॉस्पिटल ते दापोडी पवना-मुळा संगम या १०.३० किलोमीटर क्षेत्रातील जलपर्णीचे काम वैष्णवी एंटरप्रायजेस, इंद्रायणी नदीतील तळवडे येथील सिंटेल कंपनी ते बटवाल वस्ती, मोशी बंधारा या १०.५५ किलोमीटर अंतरातील जलपर्णीचे काम सैनिक इंटेलिजन्स आणि इंद्रायणी नदीतील बटवाल वस्ती, मोशी बंधारा ते हिरामाता मंदिर, चऱ्होली एसटीपी प्रकल्प या ९.४८ किलोमीटर क्षेत्रातील जलपर्णी काढण्याचे काम बापदेव महाराज स्वयंरोजगार संस्थेला देण्यात आले आहे.

हेही वाचा >>>नारायणगावमध्ये टोमॅटोला प्रति किलो एक रुपये भाव, शेतकऱ्यांकडून बाजार समिती आवारात टोमॅटो फेकून निषेध

तीन नद्यांमधील जलपर्णी काढण्यासाठी चार कोटी दहा लाख ४३ हजार रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. सहा महिन्यांची कामाची मुदत ३१ मे रोजी संपणार आहे. मुदत संपण्यास सहा दिवस शिल्लक असतानाही नदीपात्रातील जलपर्णी ‘जैसे थे’ आहे. नदी पात्रात अनेक ठिकाणी जलपर्णी साचली आहे. ठेकेदारांकडून संथगतीने कामकाज केले जाते. पाऊस पडण्याची वाट पाहिली जाते. पाऊस पडल्यानंतर नदी पात्रातील पाण्याच्या प्रवाहाने जलपर्णी वाहून जाते. परिणामी, कोट्यवधी रुपये पाण्यात जातात. याकडे आरोग्य विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष होताना दिसते.

हेही वाचा >>>पुणे: सिंहगडाच्या परिसरात प्रागैतिहासिक काळापासून मानवाचे अस्तित्व? खडकावरील रेखाटने उजेडात

ड्रोनने तपासणी

नदीपात्रामधील जलपर्णी काढली आहे की नाही, हे तपासण्यासाठी ड्रोनचा वापर केला जातो. त्यासाठी ठेकेदाराची नियुक्ती केली आहे. त्याला वर्षाला तीन लाख रुपये खर्च केला जात आहे. त्या माध्यमातून शहरातील नद्यांमध्ये किती जलपर्णी आहे हे १५ दिवसाला तपासले जाते.

नदी पात्राच्या कडेला अद्यापही जलपर्णी आहे. त्यामुळे डांसाचा उपद्रव होत आहे. ठेकेदारांकडून पावसाळ्याची वाट पाहिली जाते. पाण्याच्या प्रवाहाने जलपर्णी वाहून जाते. कोणतेही काम न करता ठेकेदार बिले घेतात. जलपर्णीवरील लाखांचा खर्च कोटींवर पोहोचला आहे. आरोग्य विभागाने लक्ष देऊन ठेकेदारांकडून जलपर्णी काढून घ्यावी.-राजू साळवे, मनसे

जलपर्णीचा आढावा घेतला आहे. नदी पात्रातील ज्या भागात जलपर्णी आहे, ड्रोन सर्व्हेमध्येही जलपर्णी दिसत असेल, तर ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.-जितेंद्र वाघ,अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A fund of four crores was wasted for removal of aquatic plants from pavana mula indrayani river basin pune print news ggy 03 amy
First published on: 25-05-2023 at 09:39 IST