पिंपरी-चिंचवडमध्ये राहत्या घराच्या तिसऱ्या मजल्याच्या बाल्कनीतून पडल्याने पाचवीत शिकणाऱ्या एका ११ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. आज पहाटेच्या सुमारास पिंपळे गुरव परिसरात ही दुर्घटना घडली. या मुलीच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या. त्यामुळे आजारपणाला कंटाळून तिने हा प्रकार केला असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, गौरी राऊत (वय ११, रा. पिंपळे गुरव) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. तिच्या दोन्ही किडन्या निकामी होत्या तिच्यावर उपचार सुरू होते. यामुळे ती आपल्या शाळेपासून आणि मित्र-मैत्रिणींपासून दुरावली होती. या नैराश्यातूनच तिने आत्महत्येचा प्रयत्न केला असावा असा पोलिसांना संशय आहे. याच दिशेने त्यांनी तपासही सुरु केला आहे.

गौरी जेव्हा तिसऱ्या मजल्याच्या बाल्कनीतून खाली पडली. तेव्हा पहाटेची वेळ होती, घरातील सर्वजण झोपेत होते. दरम्यान, घराखालून जाणाऱ्या एका व्यक्तींनी पहाटेच्या सुमारास गौरीला रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेले पाहिले. त्यानंतर तो व्यक्ती तिसऱ्या मजल्यावर गेला आणि त्याने गौरीच्या घराचा दरवाजा ठोठावला आणि घरातील व्यक्तींना झोपेतून उठवून घटनेची माहिती दिली. त्यानंतर तातडीने कुटुंबियांनी तिला रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत गौरीने आपले प्राण सोडले होते. तिच्या डोक्याला गंभीर मार लागला होता.