मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर नवले पुलाजवळ शनिवारी सायंकाळी भरघाव ट्रकचा ब्रेक निकामी झाला आणि ट्रकने चार वाहनांना धडक दिली. अपघातात दोघे जखमी झाले असून या प्रकरणी पोलिसांनी ट्रकचालकास ताब्यात घेतले. पंकज महापात्रे (वय ५७, रा. उमरगा, जि. उस्मानाबाद) असे ताब्यात घेण्यात आलेल्या ट्रकचालकाचे नाव आहे.
हेही वाचा- पुणे : पोटनिवडणुकीसाठी आदित्य ठाकरे रिंगणात; कसबा आणि चिंचवडसाठी सोमवारी रोड शो आयोजित
बाह्यवळण मार्गावरुन सायंकाळी सातच्या सुमारास शिरवळहून फ्रीज तसेच गृहोपयोगी साहित्य घेऊन अवजड ट्रक (कंटेनर) निघाला होता. नवले पुलापासून काही अंतरावर भूमकर पूल आहे. ट्रक सेवा रस्त्यावर येत असताना अचानक ट्रकचे ब्रेक निकामी झाले. ट्रकने समोरुन येणाऱ्या दोन मोटारी, रिक्षा तसेच दुचाकीला धडक दिली.
हेही वाचा- पुणे : चिंचवडमधील उमेदवारांच्या प्रचाराच्या खर्च तपासणीचे वेळापत्रक जाहीर
अपघातात दोघे जण जखमी झाले. अपघातानंतर नागरिकांनी ट्रकचालकाला मारहाण केली. अपघातात जखमी झालेल्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. ब्रेक निकामी झाल्याने अपघात झाल्याचे ट्रकचालक महापात्रे याने पोलिसांना सांगितले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महापात्रेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, असे सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे यांनी सांगितले.
पोलिसांचे प्रसंगावधान
बाह्यवळण मार्गावर अपघातांचे सत्र कायम आहे. त्यामुळे बाह्यवळण मार्गावर वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी पोलीस नेमण्यात आले. ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याचे वाहतूक पोलीस कर्मचारी माधव गोपनर, महेंद्र राऊत, सुशांत यादव यांनी पाहिले. पोलिसांनी तातडीने सेवा रस्त्यावरील वाहतूक थांबविली. ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याचे ट्रकचालक महापात्रे याच्या लक्षात आले होते. अपघातानंतर काही काळ वाहतूक कोंडी झाली. पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.