पुणे : वाडिया महाविद्यालय परिसरातील पुलावर अचानक भटके श्वान आडवे आल्याने दुचाकी घसरुन तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. पियूष किरीट मंडलिया (वय २८, रा. रास्ता पेठ) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. पियूष एका हाॅटेलमध्ये डिजे म्हणून काम करत होता. दुचाकीस्वार पियूष हा वाडिया महाविद्यालय परिसरातील पुलावरुन निघाला होता. त्या वेळी अचानक श्वान आडवे आल्याने  पियूष याचे नियंत्रण सुटले. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. कोरेगाव पार्क पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे.