‘दागिने घ्यायचे तर ते सोन्याचेच आणि तेही आपल्या ठरलेल्या सराफी दुकानातून,’ हा विचार आता हळूहळू बदलू लागला आहे. सोन्याच्या दागिन्यांच्या जागी चांदी आणि इतर धातूंचे तितकेच आकर्षक दागिने येऊ लागले आहेत. केवळ स्वस्त म्हणून नव्हे, तर इतरांपेक्षा वेगळ्या घडणीचे आणि सहज वापरण्याजोगे म्हणून असे दागिने लोकप्रिय होत आहेत. ‘आद्या’ या पुण्याच्या ‘ब्रँड’ने चार वर्षांपूर्वी असे काही वेगळ्या प्रकारचे दागिने बाजारात आणले आणि आज ‘ऑनलाईन’ विक्रीच्या माध्यमातून जवळपास ९० देशांमध्ये त्यांचे दागिने पोचले आहेत.
‘आद्या ओरिजिनल्स’ या दागिन्यांच्या ‘ब्रँड’बद्दल इंटरनेट वापरणाऱ्या स्त्रियांनीतरी कुठे-ना-कुठे नक्की वाचलेले असते. चांदीत घडवलेल्या पारंपरिक दागिन्यांना सध्या खूप पसंती मिळते. पुण्याच्या सायली मराठे यांनी सुरू केलेल्या या ब्रँडने असे अनेक वेगळे आणि सुरेख दागिने आणले आणि दागिन्यांवर प्रेम करणाऱ्या स्त्रियांच्या कपाटातील खजिन्यात ‘आद्या’ने जागा मिळवली.
मराठे या खरे तर संगणक अभियंता. त्याच क्षेत्रात त्यांनी नऊ वर्षे नोकरी केली. त्यामुळे सुरूवातीला दागिन्यांच्या व्यवसायाची त्यांना ओळख नव्हती. परंतु आधीपासून त्यांना विविध प्रकारचे दागिने जमवण्याची प्रचंड आवड होती. कामानिमित्त युनायटेड किंग्डममध्ये असताना त्या दागिने बनवण्यासाठीची किट्स वापरून स्वत:च प्रयोग करत दागिने बनवू लागल्या. मैत्रिणींना भेटवस्तू म्हणून ते दागिने त्या देऊ लागल्या. त्याचे खूप कौतुक होऊ लागले आणि त्यांनी हे व्यवसाय म्हणून करावे, असे सुचवले जाऊ लागले. मग त्यांनी स्वनिर्मित दागिन्यांचे प्रदर्शन भरवले. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर सायली यांनी २०१३ मध्ये फेसबुकवरून दागिने विकण्यास सुरूवात केली. सव्वा वर्षांत दागिन्यांना असलेली ‘ऑनलाईन’ मागणी खूप वाढू लागली. त्यामुळे त्यांनी २०१४ मध्ये नोकरी सोडून पूर्णवेळ हाच व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला.
फेसबुकवर फार काळ दागिने विक्री नको, असा सायली यांचा विचार होता. त्यामुळे आधी स्वत:चे संकेतस्थळ सुरू करून त्याद्वारे रीतसर ‘ऑनलाईन’ विक्री त्यांनी सुरू केली. अगदी ५० उत्पादनांसह त्यांचे संकेतस्थळ सुरू झाले. त्या वेळी केवळ दागिने विकणारी संकेतस्थळे आताइतक्या संख्येने नव्हती. सुरूवातीला प्रतिमहिना सायली यांच्याकडे दागिन्यांच्या ३० ग्राहकांकडून दागिन्यांची मागणी येत असे. आता महिन्याला ५०० ग्राहक मागणी नोंदवतात, तर त्यांच्या संकेतस्थळावर सहा हजार नोंदणीकृत ग्राहक आहेत. आता त्यांनी स्वत:चे ‘अॅप’ देखील बनवले आहे. विशेष म्हणजे त्या फक्त पुण्यातच नव्हे, तर परदेशातही दागिने पुरवतात. आजवर ९० देशांमध्ये त्यांनी दागिने पाठवले आहेत. पुण्यात प्रभात रस्त्याजवळ ‘आद्या’चा छोटा ‘ज्वेलरी स्टुडिओ’ आहे. पुण्यासह मुंबई आणि कोल्हापूरमध्ये या दागिन्यांचे उत्पादन होते.
दागिने बनवून विकण्याच्या व्यवसायात स्पर्धा आधीपासून होती. त्यात ‘आद्या’ने आपले वेगळेपण टिकवले. विविध संकेतस्थळांवर दागिने मिळत असले तरी ते वेगवेगळ्या उत्पादकांचे असतात. ‘आद्या’ची ७० ते ८० टक्के उत्पादने स्वत: ‘डिझाईन’ केलेली आणि खास बनवून घेतलेली आहेत, असे सायली सांगतात. ठुशीसारख्या काही ठरावीक दागिन्यांना नव्याने ‘डिझाईन’ करण्याची आवश्यकता नसते. अशी २० टक्केच उत्पादने त्या थेट विकतात.
दागिन्यांची खूप आवड असलेल्या स्त्रियांनाही रोजच्या धावपळीत दागिने वापरणे अवघड वाटते. त्यामुळे सहज वापरता येतील असे दागिने बनवण्यावर ‘आद्या’ने भर दिला. आत्ता जानेवारीत आलेल्या त्यांच्या दागिन्यांच्या ‘इतिहास कलेक्शन’ला प्रचंड प्रतिसाद मिळाला. हे सर्व दागिने पारंपरिक दागिन्यांमधून प्रेरणा घेऊन, पण चांदीत, नव्या पद्धतीने वापरता येतील असे बनवण्यात आले आहेत. अनेक स्त्रियांना कानात कुडी घालायला आवडते. पण सोने किंवा मोत्यांची कुडी रोजच्या कपडय़ांवर, जीन्स वगैरेवर वापरता येत नाही. अशांना ‘आद्या’च्या ‘इतिहास’ कलेक्शनमधील चांदीची कुडी आवडली. कुडीच्याच ‘डिझाईन’ची चांदीची अंगठी, चांदीचा कोल्हापुरी साज, ठुशी, चांदीची नथ, कुडत्यावर क्लिपेने बसवण्याचे चांदीचे ‘जाली कुर्ता पेंडंट’ असे बाजारात सहसा न मिळणारे ‘आद्या’ने आणले. स्पृहा जोशी, गिरिजा गोडबोले, विभावरी देशपांडे, पर्ण पेठे अशा अनेक अभिनेत्री त्यांचे दागिने वापरतात. त्यामुळेही हे दागिने अधिक लोकप्रिय झाले. इतकेच नव्हे, तर ‘बेगम जान’च्या प्रसिद्धीच्या कार्यक्रमात अभिनेत्री विद्या बालन हिने ‘आद्या’चे दागिने वापरले आहेत, असे सायली सांगतात.
‘आद्या’ने सोन्यामध्येही दागिने बनवले. कोणत्याही धातूत दागिने घडवण्यापूर्वी त्याविषयी पूर्ण माहिती घ्यावी लागते. त्यामुळे सोन्याच्या दागिन्यांना डाग कसे देतात हे पाहण्यापासून त्या दागिन्यांची किंमत कशी ठरते इथपर्यंत त्यांना शिकून घ्यावे लागले.
‘दागिन्यांचा व्यवसाय करताना चांगल्या दर्जाची वस्तू विकण्यावर भर हवा. शिवाय ग्राहकांची आवड ओळखून त्यांना बाजारातील वस्तूंपेक्षा काहीतरी वेगळे द्यावे लागते. वस्तूसाठी नेमका कोणता धातू वापरला आहे, वस्तूची किंमत अधिक का आहे, कारागीरांच्या कामाचे मोल काय, हे ग्राहकांना पटवून द्यावे लागते. काही दिवशी मागणी अगदी कमी असते, तर काही वेळी एकाच दिवशी खूप ग्राहकांकडून मागणी नोंदवली जाते. अशा सर्व परिस्थितीत व्यावसायिकाकडे सातत्य हवे,’ असे सायली सांगतात.
आवड म्हणून दागिने बनवणाऱ्या, काहीतरी नवीन करू पाहणाऱ्या अनेक जणी आहेत. पण सगळ्यांना व्यावसायिकदृष्टय़ा मोठे होता येत नाही. सायली यांनी कोणतेही कर्ज न काढता आपल्या गुंतवणुकीवर सुरू केलेले आणि चार वर्षांतच देशाबाहेर ग्राहकांनाही आकर्षित करणारे ‘आद्या’ त्यांच्यासाठी प्रेरणादायी ठरू शकेल.
sampada.sovani@expressindia.com