पाणीटंचाईमुळे पुणे शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू असला तरी राज्यातील दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेऊन शहरवासीयांनीही काहीतरी केले पाहिजे, या भावनेतून लोकप्रतिनिधींनी कामे सुरू केली आहेत. पशुधन आणि गोधन वाचवण्यासाठी महापालिकेतर्फे चारा लागवड करण्याचा निर्णय घेण्यात आला असून गोधन वाचवण्यासाठी दत्तक योजनाही जाहीर करण्यात आली आहे. उपमहापौर आबा बागूल यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दुष्काळग्रस्त भागात दहा ट्रक चारा पाठवला.
राज्यातील सध्याची दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन महापालिकेने मुंढवा येथील पंचवीस एकर जागेवर चारा लागवड करावी व तो चारा गोधनाला उपलब्ध करून द्यावा, असा प्रस्ताव स्थायी समितीने मंजूर केला असून त्यानुसार मुंढवा येथे चारा लागवड केली जाणार आहे. राज्यात मोठा दुष्काळ असून अनेक जिल्ह्य़ांमधील शेतकऱ्यांपुढे गोधनासाठी चारा कसा उपलब्ध करून द्यायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचा परिणाम ग्रामीण अर्थव्यवस्थेवरही झाला आहे. शासनाकडून काही प्रमाणात मदत दिली जात असली, तसेच जनावरांसाठी छावण्या व अन्य शासकीय यंत्रणा उभी केली जात असली तरी अशा परिस्थितीत शहरांनी पुढाकार घेऊन काही निर्णय घेण्याची गरज निर्माण झाली आहे. हा विचार करून चारा लागवडीचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
मुंढवा येथे उपलब्ध असलेल्या पंचवीस एकर जागेवर गोधन दत्तक योजना आणि चारा लागवड अशी योजना सुरू केली जाणार आहे. या योजनेला साहाय्य करण्याचे आवाहन पुणेकरांनाही करण्यात आले आहे. नागरिकांनी आपापल्या इच्छेप्रमाणे व शक्य होईल त्या प्रमाणे गोधन दत्तक घ्यावे व त्याच्या संगोपनासाठी येणाऱ्या खर्चातील वाटा उचलावा असे आवाहन करण्यात आले आहे. महापालिका त्यासाठी बँकेत स्वतंत्र खाते उघडणार आहे. या खात्यात जमा होणारी रक्कम गोधन दत्तक योजनेवर खर्च केली जाईल. तसेच काही रक्कम जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली जाईल. मुंढवा परिसरात महापालिका जेथे चारा लागवड करणार आहे तेथे आणखी चारा लागवड करण्यासाठी जमीन उपलब्ध करून देण्याचेही आवाहन परिसरातील जमीनमालकांना करण्यात आले आहे. या भागातील पडीक जमिनी या कामासाठी दिल्यास तेथेही चारा लागवड करण्यात येईल, अशी माहिती स्थायी समितीच्या अध्यक्ष अश्विनी कदम यांनी दिली.
मराठवाडय़ात दहा ट्रक चारा पाठवला
उपमहापौर आबा बागूल यांच्या वाढदिवसानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र मुख्य कार्यक्रम बीड आणि मराठवाडय़ातील काही जिल्ह्य़ांमध्ये चारा पाठवण्याचा होता. दुष्काळग्रस्त भागात ज्या जनावरांच्या छावण्या सुरू झाल्या आहेत त्यांच्या मदतीसाठी बागूल यांनी दहा ट्रक चारा मराठवाडय़ात पाठवला. राजीव गांधी ई लर्निग स्कूल येथे झालेल्या या कार्यक्रमात पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. दुष्काळ निवारणासाठी प्रत्येकाला जी काही मदत करणे शक्य आहे ती प्रत्येकाने केली पाहिजे. याच भावनेतून चारा पाठवण्याचा उपक्रम करत असल्याचे बागूल यांनी या वेळी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aba bagul drought water supply
First published on: 17-09-2015 at 03:15 IST