पिंपरी : उद्यानामध्ये केलेल्या देखभालीच्या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी १७ हजार रुपयांची लाच स्वीकारताना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सहायक उद्यान निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. ही कारवाई बुधवारी नेहरूनगर येथील उद्यान विभागाच्या कार्यालयात करण्यात आली. किरण अर्जुन मांजरे असे सहायक उद्यान निरीक्षकाचे नाव आहे.
हेही वाचा >>> जेजुरी : खंडोबा गडावर चार स्थानिक विश्वस्तांची नेमणूक होणार, ग्रामस्थांचं आंदोलन मागे




याबाबत ४७ वर्षीय ठेकेदाराने एसीबीकडे तक्रार केली होती. तक्रारदार हे ठेकेदार आहेत. त्यांनी महापालिकेच्या उद्यानामध्ये केलेल्या देखभालीच्या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी मांजरे याने १७ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याबाबत ठेकेदाराने एसीबीकडे तक्रार केली. त्यानुसार एसीबीने सापळा रचला. नेहरूनगर येथील गुलाबपुष्प उद्यानात लाच स्वीकारताना मांजरे याला रंगेहाथ पकडले. त्याच्यावर भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.