भरधाव मोटारसायकल घसरल्याने पंधरा ते वीस मीटर फटफटत जाऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या चेंबरमध्ये पडल्याने दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील पुनावळेजवळील चौघुले इंडस्ट्रीजवळ रविवारी सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली. या दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
अभिषेक सिंग (वय २२, रा. सिल्वर स्कोप, काळेवाडी, मूळ- छत्तीसगड) आणि परवेज अख्तर (वय २३, रा. कोंढवा) अशी जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत. हे दोघेही इंदिरा कॉलेजमध्ये एमबीएचे शिक्षण घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिषेक आणि परवेज हे मोटारसायकलवरून पुण्याकडून लोणावळ्याकडे जात होते. द्रुतगती मार्गावरून जात असताना पुनावळे येथील चौघुले इंडस्ट्रीसमोर भरधाव असलेली दुचाकी घसरून दोघे पंधरा ते वीस मीटर फरफटत गेले. अपघात झाला त्या ठिकाणी रस्त्याच्या कडेलाच उघडय़ा असलेल्या चेंबरमध्ये जाऊन दोघे पडले. चेंबरमध्ये पडल्यामुळे दोघांना गंभीर दुखापत झाली आहे. घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस आणि नागरिकांनी त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक नीलेश जगदाळे हे अधिक तपास करीत आहेत.