पुणे : चांदणी चौकात विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचा मंगळवारी दुपारी अपघात झाला. अपघातात शिशू गटातील चार ते पाच मुले जखमी झाले असून, त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अपघातात जखमी झालेले चार ते पाच मुले एमआयटी संस्थेच्या प्री-स्कूलमधील आहे. मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर मुले रिक्षातून घरी निघाली होती. मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील भुयारी मार्गात रिक्षाचालकाचे नियंत्रण सुटले. रिक्षा पाठीमागून डंपरवर आदळली. अपघातात रिक्षातील चार ते पाच मुले जखमी झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.
हेही वाचा – पिंपरी-चिंचवडमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग; डोळा मारून मिठीत ओढले!
हेही वाचा – पुणे जिल्ह्यात विकास कामांवरून आजी – माजी आमदारांमध्ये खडाजंगी
अपघाताची माहिती मिळताच पाेलीस, तसेच वाहनचालकांनी तातडीने विद्यार्थ्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. चार मुलांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, एका मुलाला किरकोळ दुखापत झाली आहे. अपघातानंतर पालकांनी रुग्णालयात धाव घेतली. आठवडाभरापूर्वी वाघोलीत शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसचा अपघात झाला होता. बसचालकाचे नियंत्रण सुटून बस झाडावर आदळली होती.