पुणे महापालिकेचे प्रभारी आरोग्यप्रमुख डॉ. एस. टी. परदेशी यांची नोंदणी मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाने रद्द केल्यामुळे अखेर त्यांच्यावर मंगळवारी निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश आयुक्त महेश पाठक यांनी दिले असून परदेशी यांच्या पदाचा कार्यभार डॉ. वैशाली जाधव यांच्याकडे देण्यात आला आहे.
डॉ. परदेशी यांची वैद्यकीय सनद महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलने यापूर्वीच रद्द केलेली असतानाही त्यांनी वेगवेगळ्या नियमांचा आधार घेत आतापर्यंत कारवाई टाळली होती. त्यांची सनद रद्द झाल्यामुळे ते आरोग्यप्रमुख या पदावरच राहू शकत नाहीत, असेही वेळोवेळी निदर्शनास आणून दिले जात होते. मात्र, त्यांची नोंदणी मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाकडे झालेली असल्यामुळे त्यांचे पद टिकून राहिले होते. याच नोंदणीच्या आधारे त्यांनी गेल्या महिन्यात आरोग्यप्रमुख पदासाठी झालेल्या निवड प्रक्रियेतही भाग घेतला होता आणि त्या पदासाठी मुलाखतही दिली होती. मनसेचे नगरसेवक रवींद्र धंगेकर यांनीही परदेशी यांच्या विरोधात अनेक पुराव्यांनिशी तक्रारी केल्या होत्या. तरीही कारवाई केली जात नव्हती. भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेतही डॉ. परदेशी यांच्याबाबत प्रश्न विचारले होते.
मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाचे (भारतीय आयुर्विज्ञान परिषद) अतिरिक्त सचिव डॉ. पी. प्रसन्नराज यांनी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलला पत्र पाठवून इंडियन मेडिकल रजिस्टरमधून डॉ. परदेशी यांचे नाव रद्द केल्याचे २१ जून रोजी कळवल्यामुळे अखेर महापालिकेने त्यांच्यावर मंगळवारी कारवाई केली. या पत्राची प्रत महापालिका आयुक्तांनाही आली आहे. स्थायी समितीच्या बैठकीत धंगेकर यांनी मंगळवारी परदेशी यांची नोंदणी रद्द होऊनही त्यांना पाठीशी का घातले जात आहे, असा प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यासंबंधीचे निवेदन आयुक्त पाठक यांनी स्थायी समितीच्या बैठकीत केले.
गॅलेक्सी रुग्णालयाला
परदेशी यांच्याकडूनच परवानगी
कर्वे रस्त्यावरील गॅलेक्सी रुग्णालयाने अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र घेतलेले नसताना, तसेच रुग्णालयात अनेक अनियमितता असताना आणि तसे लेखी आक्षेप संबंधित अधिकाऱ्यांनी घेतलेले असतानाही त्या रुग्णालयाला झटपट नोंदणी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही डॉ. परदेशी यांनीच केली होती.