पीएमपीच्या जाहिरात विभागातील घोटाळ्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेले आरोप अखेर खरे ठरले आहेत. पीएमपी बसथांब्यांवरील जाहिरातींच्या व्यवहारांची सखोल चौकशी केल्यानंतर मोठा घोटाळा उघडकीस आला असून याप्रकरणी जाहिरात विभाग प्रमुखांची पदावरून तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यांची आता विभागीय चौकशी केली जाईल.
पीएमपीचे पुणे व पिंपरीमध्ये मिळून साडेचार हजार बसथांबे असून त्यावर केल्या जाणाऱ्या जाहिरातींमध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार काही अधिकारी गेली अनेक वर्षे करत असल्याची तक्रार मनसेचे महापालिकेतील गटनेता वसंत मोरे यांनी गेल्या महिन्यात पुराव्यांनिशी केली होती. त्यांच्या तक्रारीनंतर पीएमपीने तातडीने पंधरा अधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमली आणि या समितीने सर्व जाहिरात करार तसेच ठेकेदारांबरोबर झालेले व्यवहार आणि सर्व बसथांब्यांची तपासणी केली.
या तपासणीमध्ये अनेक गडबडी उघडकीस आल्या असून जाहिरात विभाग प्रमुख रमाकांत भोकरे यांची तातडीने खासगी बस विभागात बदली करण्यात आली आहे. पीएमपीच्या आदेशात त्यांची बदली प्रशासकीय कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने करण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले असले, तरी चौकशी अहवालामुळेच त्यांची बदली झाल्याचे वसंत मोरे यांनी सांगितले.
पीएमसी बसथांब्यावर जाहिराती करणाऱ्या आठ-दहा कंपन्यांबरोबर प्रशासनाने केलेले चुकीचे करार, त्यांना प्रत्यक्ष जाहिरातीसाठी दिलेले थांबे तसेच करारांचे नूतनीकरण न करताच अनेक वर्षे कंपन्यांना जाहिरातींचे हक्क देणे, कंपन्यांना फायदेशीर ठरतील अशा पद्धतीचे व्यवहार करणे, करारनाम्यात कालावधीची नोंद न करणे, बसथांब्यांची एकूण संख्या किती, किती ठेकेदारांना काम देण्यात आले आहे याची माहिती उपलब्ध नसणे, बसथांबे स्थलांतरात योग्य कामकाज न करणे आदी अनेक आक्षेप बसथांबे तपासणी अहवालात चौकशी समितीने नोंदवले आहेत.
बसथांब्यांची संख्या किती याचीच माहिती पीएमपीकडे उपलब्ध नसणे ही गंभीर बाब असून त्या यादीची व प्रत्यक्ष थांब्याची आता पुन्हा तपासणी होणार आहे. चौकसी समितीने जे आक्षेप अहवालात नोंदवले आहेत त्याबाबत संबंधितांकडून खुलासा घेण्यात येणार आहे. पीएमपीमध्ये हा जाहिरात घोटाळा अनेक अधिकाऱ्यांच्या संगनमताने अनेक वर्षे सुरू असून एकेका जागेवर दहा-दहा वर्षे तेच अधिकारी प्रमुख म्हणून काम पाहात असल्यामुळे असे प्रकार होत असल्याचे मोरे यांनी सांगितले.