राज्यात अभियांत्रिकी शाखेच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी पुढील वर्षांपासून (२०१४-१५) विषयांनुसार प्रवेश परीक्षा देण्याची आवश्यकता नसून हे प्रवेश ‘गेट’च्या माध्यमातून करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
राज्यात अभियांत्रिकीच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाला (एम.टेक, एम.ई) ज्या विषयामध्ये स्पेशलायझेशन करायचे आहे, त्या विषयानुसार स्वतंत्रपणे प्रवेश परीक्षा घेण्यात येत होती. मात्र, पुढील शैक्षणिक वर्षांपासून (२०१४-१५) पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीच्या विषयांची स्वतंत्रपणे परीक्षा देण्याची गरज यापुढे राहणार नाही. राज्यातील अभियांत्रिकी शाखेचे पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे प्रवेश ‘गेट’ म्हणजेच ग्रॅज्युएट अॅप्टिटय़ूड टेस्ट इन इंजिनिअरिंग या परीक्षेच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत. गेटसाठी नॉन झीरो स्कोअर असणारे विद्यार्थी प्रवेशाला पात्र ठरणार आहेत. याबाबत तंत्र शिक्षण संचालनालयाने परिपत्रक काढले आहे.
गेट परीक्षेचे अर्ज २ सप्टेंबरपासून या संकेतस्थळावर उपलब्ध झाले असून  १ ऑक्टोबपर्यंत अर्ज भरण्यासाठी अंतिम मुदत आहे. १ फेब्रुवारी ते २ मार्च या कालावधीमध्ये ऑनलाइन पद्धतीने ही परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेबाबत http://gate.iitkgp.ac.in/gate2014/ या संकेतस्थळावर अधिक माहिती उपलब्ध आहे.