दहावीचा निकाल वाढूनही ओढा कमी

पुणे : राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) प्रवेश प्रक्रियेत गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ४५ हजारांनी कमी नोंदणी झाली आहे. गेली काही वर्षे आयटीआय प्रवेशाकडे असलेला ओढा यंदा घटल्याचे दिसून येत आहे.

व्यवसाय प्रशिक्षण आणि शिक्षण संचालनालयाकडून (डीव्हीईटी) राज्यातील सरकारी आणि खासगी आयटीआयमधील प्रवेशासाठी १५ जुलैपासून ऑनलाइन प्रक्रिया सुरू करण्यात आली. राज्यात शासकीय आणि खासगी आयटीआय मिळून जवळपास दीड लाख जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. आयटीआयमध्ये ९१ प्रकारचे व्यवसाय अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. त्यातील ८० अभ्यासक्रमांसाठी दहावी उत्तीर्ण, तर ११ अभ्यासक्रमांसाठी दहावी उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण उमेदवार पात्र आहेत. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी कौशल्य प्रशिक्षण घेऊन स्वावलंबी होण्यासाठी त्यांना ११ अभ्यासक्रमांना संधी देण्यात येत आहे. प्रवेश अर्ज भरण्यासाठीची मुदत ३१ ऑगस्टला संपली. त्यानंतर आढावा घेतला असता गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा नोंदणी कमी झाल्याचे चित्र आहे.

तुलनेत…

गेल्या वर्षी ३ लाख ३२ हजार २१८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, तर यंदा २ लाख ८६ हजार ३९४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यातील २ लाख ६२ हजार १०१ विद्यार्थ्यांनी अर्ज भरून पूर्ण केले. तर २ लाख ५६ हजार ४७ विद्यार्थ्यांनी शुल्क भरले, २ लाख ३८ हजार ८५६ विद्यार्थ्यांनी प्राधान्यक्रम भरले. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत ४५ हजार ८२४ विद्यार्थ्यांनी नोंदणी कमी के ल्याचे स्पष्ट झाले आहे.

यंदा अंदाज चुकला…

अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे दहावीचा निकाल जाहीर करण्यात आल्याने दहावीच्या निकालात वाढ झाली होती. त्यामुळे गेल्या काही वर्षांत आयटीआयच्या अभ्यासक्रमांकडे असलेला ओढा पाहता यंदा आयटीआयच्या प्रवेशांमध्ये वाढ होण्याचा अंदाज होता. प्रत्यक्षात तसे घडलेले नसल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

विद्यार्थी नोंदणी कमी होण्याची विविध कारणे आहेत. त्यात करोनामुळे झालेले स्थलांतर, आर्थिक अडचणी अशी काही कारणे प्रामुख्याने सांगता येतील. आर्थिक अडचणींमुळे काही विद्यार्थ्यांनी प्रवेश न घेण्याचा पर्याय स्वीकारलेला असू शकतो. मात्र प्रवेशाच्या पुढील टप्प्यांवर नोंदणी वाढू शकते. आतापर्यंत अर्ज न के लेल्या विद्यार्थ्यांना पुढील फे ऱ्यांमध्ये अर्ज करता येईल. तसेच काही विद्यार्थी संस्थास्तरावरही प्रवेश घेऊ शकतात.

– डॉ. अनिल जाधव, संचालक, व्यवसाय प्रशिक्षण आणि शिक्षण संचालनालय